BJP has 'entry' to vaibhav pitchads , 'no entry' for sangram jagtap and rahul jagtap | भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ?

भाजपात पिचडांना ‘एन्ट्री’ तर जगतापांना ‘नो एन्ट्री’ ?

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायमपिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’भाजपामध्ये घेण्यास नेतृत्व सकारात्मक दिसत नाही

नवनाथ खराडे
अहमदनगर : गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू झालेली पक्षांतराची लाट कायम आहे. या लाटेत अकोले तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि श्रीगोंदा मतदारसंघातील आमदार राहुल जगताप हेही भाजपामध्ये जाण्यास उत्सुक आहेत. मात्र पिचड यांना ‘एन्ट्री’ दिलेल्या भाजपातून दोन्ही जगतापांना मात्र ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीपासून भाजपमध्ये मोठमोठ्या नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला न सोडल्यामुळे डॉ.सुजय विखे हे मोठ्या दिमाखात भाजपात गेले. त्यांचे वडील यांनीही थोड्याच दिवसात काँग्रेसला बाय-बाय करत राज्याच्या राजकारणात मंत्रीपद मिळविले. या दरम्यान जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक सुप्त हालचाली सुरुच होत्या. लोकसभेच्या निवडणुकीत युतीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे आमदार भाजप-सेनेमध्ये जाण्यास इच्छुक होते. तशी फिल्डींग लोकसभा निवडणुकीनंतर लगेच त्यांनी लावण्यास सुरुवात केली. अजूनही जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे अनेक आमदार फिल्डींग लावून आहेत.
सर्वात प्रथम आमदार राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. त्यानंतर अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड यांनीही भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. शहराचे आमदार संग्राम जगताप यांनीही भाजपात जाण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली. श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप हेही भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. मात्र नगर शहर आणि श्रीगोंदा शहरातील परिस्थिती पाहता दोघांनाही भाजपामध्ये घेण्यास नेतृत्व सकारात्मक दिसत नाही. यदाकदाचित पक्षामध्ये यायचे असेल तर ‘उमेदवारी मागू नका’ अशीही अट त्यांच्यासमोर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही जगताप सध्यातरी वेटिंगवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अहमदनगर शहरात सेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी पाचवेळा विजय मिळविला आहे. गेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव करत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप आमदार झाले. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना आणि काँग्रेस - राष्ट्रवादी वेगवेगळे लढले होते. ४९ हजार ३७७ एवढी मते आमदार संग्राम जगताप यांना मिळाली होती. तर सेनेचे अनिल राठोड यांना ४६ हजार ६१ मते मिळाली होती. ३ हजार ३१७ मतांनी जगताप यांनी विजय मिळविला होता. यावेळी भाजपचे अ‍ॅड.अभय आगरकर तिस-या स्थानी राहिले होते. त्यांना ३९ हजार ९१३ मते मिळाली होती. काँग्रसचे सत्यजित तांबे यांना २७ हजार ७६ मते मिळाली होती. या आकडेवारीचा विचार केल्यास युतीची मते नक्कीच जास्त आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे यांना तब्बल ५२ हजारांचे मताधिक्य शहरातून मिळाले आहे. युती झाल्यास शहराची जागा शिवसेनेला जाईल. शिवसेनेकडून अनिल राठोड उमेदवार असतील. युती झाली नाही तर भाजपाकडून अ‍ॅड.अभय आगरकर, माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांची नावेही पुढे येतील. त्यामुळे लोकसभेत पराभूत झालेले आमदार संग्राम जगताप यांना भाजपमध्ये घेऊन नेमके काय साध्य होणार ? असा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना ‘नो एन्ट्री’चा बोर्ड दाखविण्यात आल्याचे समजते. असाच प्रश्न श्रीगोेंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्याबाबतीत निर्माण झाला आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातील माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करत विधानसभा लढविली. मात्र त्यांना राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळचा सामना दुरंगी होता. तालुक्यातील ज्येष्ठ नेते दिवगंत शिवाजीराव नागवडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल जगताप रिंगणात उतरले होते. तसेच राहुल जगताप यांचे वडील दिवगंत कुंडलिकराव जगताप आणि शिवाजीराव नागवडे यांनी भाजपचे बबनराव पाचपुते यांच्याविरोधात मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मोट बांधली होती. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ अशा सर्वांना एकत्र आणले होते. दिवगंत शिवाजीराव नागवडे यांच्या शब्दाला मानणारा मतदारसंघात मोठा वर्ग आहे. सर्वजण एकत्र आल्याने अवघ्या २५ वर्षाचे राहुल जगताप आमदार झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा २०१४ मध्ये १० हजार मते वाढूनही पाचपुते यांना पराभव स्वीकारावा लागला होता. राहुल जगताप यांना ९९ हजार २८१, बबनराव पाचपुते ८५ हजार ४४ तर शिवसेनेचे शशिकांत गाडे २२ हजार ५४ मते मिळाली होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आमदार राहुल जगताप यांना पुन्हा मोट बांधणे आता अशक्य आहे. अनुराधा नागवडे याही विधानसभेसाठी उत्सुक आहेत. अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब हराळ हे विखे समर्थक आहेत. त्यामुळे ते भाजपासाठीच काम करतील.
भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी कोण-कोण नेते युतीत जातात, हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

पिचडांना का स्वीकारले भाजपाने ?
आमदार वैभव पिचड यांचे वडील माजी मंत्री मधुकरराव पिचड हे अकोले मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले होते. त्यानंतर गतवेळीच्या विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड राष्ट्रवादीतून निवडून आले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही पिचड पिता-पुत्रांनी अकोले तालुक्यातून आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्य मिळवून दिले. ही वस्तुस्थिती पाहता अकोले तालुक्यावर पिचड यांचे एकहाती वर्चस्व आहे. तालुक्यातील आदिवासी समाजही पिचडांच्या मागे आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाची नक्कीच एक जागा पिचडांच्या रुपाने वाढणार आहे. अकोले तालुक्यात भाजपालाही तगडा उमेदवार नसल्याने, पिचड यांच्या रुपाने अकोलेत कमळ फुलण्याची शक्यता असल्याने भाजपाने पिचड यांना सहज स्वीकारले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत वैभव पिचड यांना राष्ट्रवादीकडून ६७ हजार ६९६ मते मिळाली होती. सेनेचे मधुकर तळपाडे ४७ हजार ६३४ तर भाजपाचे २७ हजार ४४६ मते मिळाली होती.

Web Title: BJP has 'entry' to vaibhav pitchads , 'no entry' for sangram jagtap and rahul jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.