पारा ४० च्या पुढे, तरीही वाढतेय रोहयो मजुरांची संख्या

By चंद्रकांत शेळके | Published: May 8, 2024 08:37 PM2024-05-08T20:37:16+5:302024-05-08T20:37:34+5:30

आठवडाभरात वाढले १० हजार मजूर : निवडणुकीचा उपस्थितीवर परिणाम नाही

Beyond Para 40, the number of rojgar hami yojana laborers is still increasing | पारा ४० च्या पुढे, तरीही वाढतेय रोहयो मजुरांची संख्या

पारा ४० च्या पुढे, तरीही वाढतेय रोहयो मजुरांची संख्या

अहमदनगर : इतर वेळी रोजगार हमीच्या कामांवर मजुरांचा दुष्काळ असतो. मात्र, यंदा दुष्काळात रोहयोवरील मजूर कमालीचे वाढले आहेत. एकाच आठवड्यात तब्बल १० हजार मजूर वाढलेले असून, सध्या जिल्ह्यातील २१०४ कामांवर १८ हजार ५४२ मजूर काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा कोणताही परिणाम मजूर उपस्थितीवर जाणवत नसल्याचे यातून दिसत आहे. 

रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामांतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. फळबाग लागवड, रस्त्यांची कामे, गायी गोठ्याची कामे, वृक्षलागवड, घरकुलाची कामे, शोषखड्डे, आदी कामे ग्रामीण भागात रोहयोच्या माध्यमातून केली जातात. या योजनेतून १०० दिवसांच्या रोजगाराची हमी शासनाकडून दिली जाते.

मजुरांनी ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी नोंदवल्यानंतर मजुरांना सरकारी यंत्रणेतून जवळची कामे उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे स्त्री आणि पुरुष अशा दोघांनाही एकच मजुरी दिली जाते. सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे लोक प्रचारात दंग असतील. परिणामी रोहयोची मजूर संख्या घटेल, असे वाटत होते. मात्र, लोकांनी निवडणुकीकडे साफ दुर्लक्ष केले असून, रोजगाराला पसंती दिल्याचे दिसते आहे. त्यामुळेच यंदाच्या उन्हाळ्यात मजूर संख्या १८ हजार ५०० पर्यंत गेली आहे.

मागील वर्षीपेक्षा दुपटीने वाढले मजूर
सध्या शेतकऱ्यांची शेतातील कामे आटोपली आहेत. त्यामुळे गावोगाव कामाची मागणी वाढत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात कामाची मागणी वाढते. परंतु यंदा त्यात दुपटीने वाढ झाली आहे. मागील वर्षी मे महिन्यात मजूर संख्या ९ हजारांपर्यंत होती. ती आता १८ हजारांच्या पुढे गेली आहे.

५० टक्के मजूर एकट्या जामखेड तालुक्यातील
चालू आठवड्यात जिल्ह्यातील २१०४ कामांवर १८ हजार ५४२ मजुरांची उपस्थिती आहे. यात ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ९ हजार ७९९ मजूर एकट्या जामखेड तालुक्यात आहेत. त्यानंतर शेवगाव तालुक्यात २ हजार ६९५, संगमनेरमध्ये १०८६, तर पारनेर तालुक्यात १ हजार १८७ मजूर कार्यरत आहेत.

२९७ रुपये मजुरी
रोहयोवरील मजुराला सध्या २९७ रुपये मजुरी मिळते. सध्या शेतीची कामे संपल्याने रस्त्याची, घरकुल, शोषखड्डे, फळबागा अशी कामे सुरू आहेत.

प्रचाराकडे पाठ
लोकसभा निवडणुकीमुळे यंदा मजूर प्रचाराकडे वळतील. परिणामी रोहयोच्या कामांवरील उपस्थिती घटेल, अशी शक्यता होती. मात्र, निवडणूक जशी जवळ येईल, तशी रोहयोच्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

Web Title: Beyond Para 40, the number of rojgar hami yojana laborers is still increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.