विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:17 PM2024-03-13T23:17:17+5:302024-03-13T23:17:51+5:30

विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाल्याची माहिती आहे.

ajit pawar ncp mla nilesh lanke will join sharad pawars party tomorrow | विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

विखेंची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंचा निर्णय; शरद पवारांच्या पक्षातील प्रवेशाचा मुहूर्त ठरला!

MLA Nilesh Lanke ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज सायंकाळी जाहीर केली. भाजपने राज्यातील पहिल्या यादीत २० उमेदवारांच्या नावाची घोषणा केली असून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे यांना संधी देण्यात आली आहे. विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाला असून ते उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते.

निलेश लंके हे गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश करतील. शरद पवार यांची उद्या दुपारी ४ वाजता पुणे येथील निवासस्थानी पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेतूनच निलेश लंके हेदेखील आपली भूमिका मांडत पक्षांतर करतील. याबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने वृत्त दिलं आहे.

अजित पवारांसाठी धक्का

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या जवळपास ४० आमदारांनी अजित पवार यांची साथ दिली होती. त्यामध्ये पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचाही समावेश होता. मात्र मागील दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या निलेश लंके यांना अजित पवार यांच्या माध्यमातून महायुतीत राहणं परवडणारं नव्हतं. कारण भाजपचे सुजय विखे हे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार असल्याने महायुतीकडून पुन्हा एकदा त्यांनाच तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती. त्यामुळे निलेश लंके हे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात होते आणि ते लवकरच पक्षांतर करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित होताच उद्या गुरुवारी सायंकाळी निलेश लंके हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. स्वत: निलेश लंके हे किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके या नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात.

"मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे. मात्र, सध्याचं राजकारण हे अनिश्चितेचं बनलं आहे. त्यामुळे, मी लोकसभा निवडणूक लढेल की नाही हे आताच सांगता येणार नाही, माझं अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे," असं म्हणत काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी पक्षांतराबाबत सस्पेन्स निर्माण केला होता. मात्र आता अखेर त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे.

Web Title: ajit pawar ncp mla nilesh lanke will join sharad pawars party tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.