कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:56 IST2025-07-02T19:52:26+5:302025-07-02T19:56:02+5:30

अहिल्यानगरमध्ये दुचाकीने पेट घेतल्याने एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला.

Youth dies one injured after being hit by bike in Ahilyanagar | कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Ahilyanagar Accident:अहिल्यानगरमध्ये एका भीषण अपघातात दुचाकी पेटल्याने त्याखाली अडकलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अहिल्यानगरमधील श्रीगोंदा-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर आढळगाव येथे देवनदी पुलानजीक भरधाव दुचाकी संरक्षण कठड्यास धडकली. अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतल्यामुळे दुचाकीखाली अडकलेल्या युवकाचा होरपळून मृत्यू झाला. आढळगाव येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात असलेल्या वळणावर हा सगळा अपघात घडला.

सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात भाजलेल्या बंटी ऊर्फ विनय संजय धालवडे (वय २५) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात अन्य एक जण जखमी आहे. श्रीगोंद्यावरून आढळगावच्या दिशेने निघालेली दुचाकी (एमएच १६ एक्यू ७६९९) देवनदीवरील पुलाजवळ संरक्षण कठड्यास धडकली. धडक जोरदार असल्यामुळे दुचाकीवरील दोघांपैकी एक जण बाजूला फेकला गेला, तर दुसऱ्याचा पाय दुचाकीखाली अडकला. 

या भीषण अपघातानंतर दुचाकीने अचानक पेट घेतला. दुचाकीखाली अडकलेला बंटी आगीमध्ये सापडला. नजीकच राहणारे अनिल जाधव तात्काळ मदतीला धावले आणि दुचाकीखाली अडकलेल्यास जीव धोक्यात घालून बाहेर काढले. जाधव परिवारातील महिलांनी धावाधाव करून पाणी टाकून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

आढळगावातील नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. पण गंभीरपणे भाजल्यामुळे बंटी धालवडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
 

Web Title: Youth dies one injured after being hit by bike in Ahilyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.