पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:34+5:302021-09-08T04:26:34+5:30

------------- रिॲलिटी चेक अरुण वाघमोडे अहमदनगर : ज्या वयात पाटीवर ‘अ ब क ड’चे धडे गिरवायचे अथवा मनसोक्त बागडायचे, ...

When the hand holding a pencil starts begging ... | पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...

-------------

रिॲलिटी चेक

अरुण वाघमोडे

अहमदनगर : ज्या वयात पाटीवर ‘अ ब क ड’चे धडे गिरवायचे अथवा मनसोक्त बागडायचे, त्याच वयात सिग्नलवर वाहनांच्या गर्दीत जीव धोक्यात घालून भीक मागणारी अनेक कोवळी मुले नगर शहरात निदर्शनास येत आहेत. विशेष म्हणजे या मुलांचे पालकच त्यांना भीक मागायला लावत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिॲलिटी चेक’मधून समोर आले आहे.

शहरातील डीएसपी चौक, स्टेट बँक चौक, स्वस्तिक चौक, बसस्थानक परिसर, झोपडी कॅन्टीन, प्रेमदान चौक आदी ठिकाणी लहान मुले आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिला वाहनचालकांकडे पैशासाठी याचना करताना दिसतात. यातील काही महिलांच्या कडेवर अगदी एक ते दाेन वर्षांची मुले दिसतात. त्या मुलांकडे पाहून बहुतांशजण त्यांना दहा ते वीस रुपये सहज देतात. भीक मागणाऱ्यांमध्ये पाच ते दहा या वयोगटातील मुलांचे प्रमाण मोठे आहे. काही मुले तर पैशासाठी हट्ट धरतात़. अशावेळी वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताचीही शक्यता असते.

----------

पोटासाठी नव्हे, पैशासाठी मुलांचा जीव धोक्यात

भीक मागून पैसे मिळविणे हा एक मोठा धंदा बनला आहे. भीक मागणाऱ्या मुलांमध्ये अनाथ अथवा निराधार एखादाच मुलगा असतो. बाकीच्या मुलांना आई-वडील असतात. सिग्नलवर एक मुलगा दिवसभर भीक मागून चारशे ते पाचशे रुपये सहज मिळवितो. त्यामुळे पैशाची चटक लागलेले नातेवाईकच या मुलांना भीक मागावयास भाग पाडत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आले आहे.

--------------

तोंडाला मास्क नाही

रस्त्यावर भीक मागणारी मुले कुठलीही सुरक्षितता बाळगत नाहीत. वाहनचालकांना थेट हात लावून ती भीक मागतात. शहरातील अनेक चौकांत रोजच हे दृश्य पाहावयास मिळत आहे. यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचाही धोका आहे.

---

बालहक्क कोण मिळवून देणार ?

माता-पित्याची पैसे कमविण्याची हाव व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही लहान मुले रस्त्यावर दिवसभर उन्हातान्हात, पावसात फिरून भीक मागतात. यातून या मुलांचे बालपण रस्त्यावरच कोमेजत आहे. या मुलांकडे महिला व बालकल्याण विभाग, तसेच पोलिसांचेही पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मुलांना बालहक्क कोण मिळवून देणार, असा प्रश्न आहे.

--------------------------

बेवारस मुलगा रस्त्यावर आढळून आला अथवा त्याला कुणी भीक मागण्यास जबरदस्ती करत असेल, तर कारवाई केली जाते. अशा मुलांना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर केले जाते. या मुलांना निवारा दिला जातो. मात्र रस्त्यावर भीक मागताना आढळून येणारी बहुतांशी मुले ही पालकांसोबत असतात. अशावेळी या मुलांना ताब्यात घेता येत नाही.

- महेश सूर्यवंशी, केंद्र समन्वयक चाईल्ड लाईन

------------

फोटो ०७ मुले

शहरातील डीएसपी चौकात वाहनांसमोर उभे राहून भीक मागताना लहान मुले.

Web Title: When the hand holding a pencil starts begging ...