भुतवडा तलावात पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 01:19 IST2016-06-23T00:38:57+5:302016-06-23T01:19:08+5:30

जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

Water stock in Bhutwara lake | भुतवडा तलावात पाणीसाठा

भुतवडा तलावात पाणीसाठा


जामखेड : जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या भुतवडा तलावात चांगल्या पावसामुळे चार दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जामखेडचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची चिन्हे आहेत.
चार मे ते पंधरा जून या कालावधीत तलावातील चार लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. सध्या तलावातील पाणी गढूळ असल्याने तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. शहराला सध्या होणाऱ्या पंधरा दिवसांपासूनच्या पाणीपुरवठ्यातून शहरवासीयांची सुटका होणार आहे. गुरुवारी तलावातील पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे.
भुतवडा तलाव तीन महिन्यापूर्वी कोरडा पडला होता. तलावात चाळीस टक्के गाळ असल्याने पाणीसाठा कमी होत होता. गेल्या ४५ वर्षात तलावातील गाळ काढला नव्हता. तलावातील गाळ काढण्यासाठी नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, शिवसेना नेते मधुकर राळेभात, नगरसेवकांनी बैठक घेऊन लोकसहभागातून गाळ काढण्यासाठी निधी गोळा करून काम तातडीने सुरवात करण्याची ग्वाही दिली.
माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी याकामी पुढाकार घेतला. नगरपरिषदेचे दहा लाख, पुणे महापौर व नगरसेवकांचे पंधरा लाख व शिवसेना जामखेड शाखेने एक लाखाची मदत तातडीने देऊन सहा पोकलॅन मशीन व ३५० ट्रॅक्टरच्या मदतीने अहोरात्र गाळ काढण्यासाठी ४ मे पासून प्रत्यक्षात सुरवात झाली. तलावासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राम शिंदे, पुण्याचे महापौर संतोष जगताप, विश्वदर्शन व पत्रकार संघ, नगरसेवक तसेच अनेक दात्यांनी मदतीचा ओघ सुरू ठेवला.
तलावातील गाळ मोठ्या प्रमाणावर काढल्याने सहा महिने पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. चार ते पाच महिन्यांपासून शहराला टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता जलवाहिनीद्वारे जामखेडमधील प्रत्येक गल्लीत पाणी मिळण्यासाठी पंधरा दिवस लागत असे. दुष्काळी परिस्थितीत शहरवासीयांना पाणी विकत घ्यावे लागले तसेच गाळ काढण्यासाठी घरोघर फिरुन मदत दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Water stock in Bhutwara lake