उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 08:44 IST2025-11-23T08:42:46+5:302025-11-23T08:44:08+5:30
गोदावरी डाव्या कालव्यालगत वसलेली ही गावे मेहनती आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे समृद्ध आहेत. आजवर दोन्ही गावांमध्ये बिबट्याचा वावर ही सामान्य बाब म्हणून पाहिली गेली

उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
सचिन धर्मापुरीकर
कोपरगाव (जि. अहिल्यानगर) : नरभक्षक बिबट्याला गोळ्या घातल्या. पण मुलांच्या मनात आजही दहशत आहे. त्यांना दररोज शाळेत सोडायला आणि आणायला पालक जातात. शेतकरीही शेतात दिवसाच जातात. उसाच्या आजूबाजूला काम करायला लोक घाबरत आहेत. मका सोंगायला मजूर तयार होत नाहीत, अशी आपली कहाणी येसगाव आणि टाकळी शिवारातील ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे मांडली.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव आणि टाकळी शिवारात उसाचे क्षेत्र जास्त आहे. गोदावरी डाव्या कालव्यालगत वसलेली ही गावे मेहनती आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे समृद्ध आहेत. आजवर दोन्ही गावांमध्ये बिबट्याचा वावर ही सामान्य बाब म्हणून पाहिली गेली. पाळीव प्राण्यांची शिकार ही फारशी गांभीर्याने घेतली जायची नाही. परंतु गेल्या दोन महिन्यांत बिबटे माणसांवर हल्ले करू लागले, तेव्हा चिंता वाढली आहे. अनेकांनी घरांना तारेचे कुंपण घातले. बाहेर पडताना लोकांच्या हातात काठ्या, दांडके असतात. रात्री टॉर्चचा वापर सक्तीचा झाला आहे.
टाकळी शिवारात ५ नोव्हेंबर रोजी नंदिनी प्रेमदास चव्हाण या तीन वर्षीय चिमुरडीचा तर १० नोव्हेंबर रोजी सकाळी येसगाव शिवारातील शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या शांताबाई अहिलू निकोले (वय ६०) या महिलेचा बिबट्याने बळी घेतला. त्यानंतर आंदोलने झाली. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आले. १५ नोव्हेंबरला शार्पशूटरने एका बिबट्याला ठार केले.. पण अजूनही बिबटे परिसरात आहेत, त्यामुळे येसगाव व टाकळी ग्रामस्थांची काळजी कमी झालेली नाही.
सुमीत दरेकर हा युवक सांगतो की, वस्तीवर जाताना उसाच्या शेतातून गुरगुरण्याचा आवाज येतो आणि धडकी भरते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना, आजूबाजूच्या वस्तींवर फोन करून मित्रांना बोलावून घेतो. पाच-सहा जण हातात, काठ्या, दांडके घेऊनच बाहेर पडतो.
शिकवणी बंद झाली
इयत्ता नववीत शिकणारी देवयानी गायकवाड आणि दहावीच्या वर्गातील समीक्षा शिंदे म्हणाली, मुलीला बिबट्याने ठार केले तेव्हापासून आई-वडिलांनी आम्हाला शाळेत किंवा ट्युशनला जाऊ दिले नाही. बिबट्याला मारल्यावर आता आम्ही शाळेत जातोय, पण वडील, काका सोडायला येतात. शिकवणी अजूनही बंदच आहे.
शेतात मजूर मिळेनात
येसगावच्या माजी सरपंच नंदिनी विष्णू सुराळकर शेतीत काम करतात. त्या म्हणाल्या, शेतात अजूनही एकटी-दुकटी बाई कामाला येत नाही.
आठ-दहा जणींचे काम असेल तरच त्या येतात. ऊस आणि मका पिकाचे क्षेत्र आमच्या भागात जास्त आहे. त्यात बिबट्या दबा धरून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे मजूर मिळत नाहीत. आम्ही पती-पत्नी देखील सावधगिरी बाळगूनच असतो.
जनजागृतीपर व्याख्यान
बिबट्याच्या दहशतीचे सावट कमी व्हावे, जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी सुमित कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नागपूर येथील वन्यजीव संरक्षक विभागाचे संचालक अजिंक्य भांबुरकर यांची जनजागृतीपर व्याख्याने येसगाव शिवारात तसेच परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये आयोजित केली आहेत. या कार्यक्रमांमधून भांबुरकर हे ‘माणूस आणि बिबट्या’ या विषयावर मार्गदर्शन करीत आहेत.