अहमदनगर : अठरा वर्षांवरील प्रत्येकजण आता लस घेण्यासाठी पात्र आहे. स्तनदा मातांना यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आता देशातल्या गरोदर महिलांनाही लस घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही गरोदर मातांना कोरोनावरील लस दिली जाणार आहे. अशा महिलांना एकाच दिवशी लस देता येईल का? याचे प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे.
देशात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोनावरील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवा कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. २१ जूनपासून देशातल्या १८ वर्षांपेक्षा मोठ्या सर्व नागरिकांना सरकारी केंद्रावर मोफत लस द्यायला सुरुवात झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट एकीकडे आटोक्यात येत आहे. तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लसीकरण मोहिमेचा वेग वाढवून ही लाट थोपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात सर्व स्तरातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. कोरोनावरील सर्वच लसीं या गरोदर महिलांसाठी योग्य असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. प्रत्येक औषधांचे आणि लसींचे जसे इतरांना छोटे परिणाम जाणवतात तसेच गरोदर महिलांनाही जाणवतील, त्यामुळे महिलांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.-----------
लस घेतल्यानंतर
हात दुखणे किंवा अंगदुखी, हलकासा ताप यासारखी लक्षणे जाणवण्याची शक्यता राहील. अगदी क्वचित काही महिलांना २० दिवसांपर्यंत ही छोटी लक्षणे जाणवतील. अशा मातांना तत्काळ वैद्यकीय मदत घेऊन उपचार घेता येणार आहेत. कोरोना होऊन गेलेल्या ९५ टक्के मातांच्या बाळांचे आरोग्य सुस्थितीत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. गरोदर स्त्रीने लस घेतल्यावर नुकत्याच जन्मलेल्या या बाळांवर थेट होणारे परिणाम दिसून आलेले नाहीत. मात्र, बाळांवर या लसींच्या दीर्घकालीन परिणामांचा अभ्यास अजून तरी झालेला नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत. ३५ वर्षांवरील मातांनी लस घेताना त्यांना असलेल्या सहव्याधींची माहिती डॉक्टरांना देऊन त्यांच्या सल्ल्याने लस घ्यावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
-------------
गरोदर महिलांनी लस घेणे सुरक्षित असल्याचे आयएमसीआरने जाहीर केले आहे. त्यामुळे गरोदर मातांनी लस घ्यावी. लस घेतल्यानंतर त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. स्तनदा मातांना लस घेण्यासाठी पूर्वीच परवानगी दिली आहे. गरोदर महिलांना एकाच दिवशी लसीकरण दिल्यास त्यांना ते सोयीचे होऊ शकेल. इतर लोकांच्या गर्दीत त्यांना लस देऊ नये.
-डॉ. सचिन वहाडणे, सचिव, आयएमए, नगर
-------------
आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिल्याने गरोदर मातांना लसीकरण देण्यात आता कोणत्याही अडचणी नाहीत. सुरक्षेच्या दृष्टीने गरोदर महिलांनी लस घ्यावी. अशा महिलांना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने लस दिली जाईल.
-डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका
-------------
असे झाले लसीकरण
कोणाला लस पहिला डोस दुसरा डोस
हेल्थ वर्कर ४४,७०८ ३३,३६०
फ्रंटलाईन वर्कर ५८,४६० २२,४६७
१८ ते ४५ वयोगट १,१८,७८३ ८,५८४
४५ ते ६० २,७३,८०३ ६०,८४९
६० वर्षांपुढील २,६९,९२९ ९७,३३२
-----
डमी आहे.- ८८७