तांदळी दुमाला येथे खते, बियाणांचा अनधिकृत साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:55+5:302021-08-12T04:25:55+5:30
गेल्या तीन दिवसांपूर्वी तांदळी दुमाला, टाकळी लोणार आणि भानगाव या तिन्ही ठिकाणी कृषी सेवा केंद्रांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात ...

तांदळी दुमाला येथे खते, बियाणांचा अनधिकृत साठा
गेल्या तीन दिवसांपूर्वी तांदळी दुमाला, टाकळी लोणार आणि भानगाव या तिन्ही ठिकाणी कृषी सेवा केंद्रांची तपासणी कृषी विभागाकडून करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या तक्रारीवरून तांदळी दुमाला येथे रवींद्र भोस यांच्या घरी खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा अनधिकृत साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के आणि पंचायत समितीचे कृषी अधिकारी डाॅ. रामकृष्ण जगताप यांनी छापा टाकला असता सुमारे ६ लाख ७५ हजार ५३५ रुपयांचा खते, कीटकनाशके आणि बियाणे असा ४० निविष्ठांचा साठा परवाना नसलेल्या ठिकाणी आढळून आल्यामुळे सर्व साठा जप्त केला आहे. याप्रकरणी कृषी विभागाकडून चौकशी सुरू असून, विनापरवाना अनधिकृत ठिकाणी साठा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
..............
तांदळी दुमाला येथे आढळून आलेला साठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका कृषी सेवा केंद्र चालकाकडे चौकशी सुरू आहे. न्यायालय तसेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या परवानगीनंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
-पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा