केडगाव : नगर तालुक्यात खरीप हंगामातील हक्काचे पीक म्हणून मुगाची लागवड केली जाते. यंदा विक्रमी पेरणी होऊनही पाऊस व वातावरणाने दगा दिल्याने मुगाच्या उत्पादनात ३० टक्क्यांपेक्षा जास्त घट आली आहे. काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने यंदा प्रथमच मोठ्या संख्येने हार्वेस्टरने मूग काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. हक्काचे उत्पन्न बुडाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली आहे.
मुगाची पेरणी झाल्यापासून पावसाचा रुसवा, सततच्या ढगाळ वातावरणामुळे मूग पिकावर बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ नये यासाठी मूग काढण्याची घाई सुरू झाली आहे. मूग काढण्याचे काम वेळखाऊ असल्याने शेतकरी आता हार्वेस्टरला पसंती देत आहेत. हरियाणा, पंजाब आणि स्थानिक शेतकऱ्यांचे मिळून शंभरहून अधिक हार्वेस्टर मूग काढणीत जुंपले आहेत.
अल्प काळात येणारे आणि भरपूर पैसे देणारे नगदी पीक म्हणून मुगाकडे पाहिले जाते. मागील वर्षीचा अनुभव पाहता यावर्षी कृषी विभागाने ५८ हजार १४६ हेक्टर पेरणीचे नियोजन केले होते. त्यातील ८५ टक्के म्हणजे तब्बल ४९ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र हे मुगाचे आहे. तालुक्यात तब्बल १५ हजार ३२७ हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली आहे. रुई छत्तीशी, वाळकी, देऊळगाव सिद्धी, खडकी, अरणगाव, सारोळा कासार, अकोळनेर, चास, कामरगाव, नेप्ती, टाकळी खातगाव, निंबळक, कार्जुने खारे, इसळक या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मूग पेरणीचे क्षेत्र आहे.
मूग तोडणीला येणाऱ्या महिला २५० ते ३०० रुपये रोजंदारी मागत आहेत किंवा वाट्याने तोडणी करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मुगाचा हाता-तोंडाशी आलेला घास हातचा जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टर यंत्राला पसंती देण्यास सुरुवात केली आहे. २ हजार ५०० रुपये एकर याप्रमाणे रक्कम हार्वेस्टरला देऊन शेतकरी मूग काढून घेत आहेत.
---
यंत्राने गुणवत्ता खालावते
मजूर मिळत नाही. त्यात शेतात ओलसरपणा नाही. कमी खर्चात व झटपट मुगाची काढणी होत असल्याने हार्वेस्टरचा वापर वाढला. मात्र, यामुळे मुगाची पॉलिश निघून जाऊन गुणवत्ता घसरत आहे. परिणामी भावही कमी मिळत आहे.
----
गेल्या वर्षी पाऊस वेळेवर झाला. त्यामुळे मुगाचे उत्पन्न चांगले वाढले. यावर्षी पाऊस चांगला होईल या आशेने दोन एकरपेक्षा जास्त मूग व सोयाबीनची पेरणी केली; परंतु पाऊस वेळेवर तर आला नाहीच, याशिवाय मुगावर मावा रोग पडला. ढगाळ हवामानामुळे फुलोऱ्यात आलेल्या मुगाचा तवर गळाला. त्यामुळे बहुतांशी झाडांच्या शेंगांचे प्रमाण घटले. परिणामी यावर्षी मुगाचे उत्पन्न घटले आहे.
-अविनाश पवार,
शेतकरी, साकत खुर्द
---
१८ नगर मूग
नगर तालुक्यातील शेतकरी अशा प्रकारे हार्वेस्टरने मूग काढणी करीत आहेत.