तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 15:49 IST2025-09-19T15:48:14+5:302025-09-19T15:49:26+5:30
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात संतापजनक घटना घडली आहे. वडिलांनी ज्या नातेवाईकांकडे मुलींना सोपवले होते, त्यानेच अत्याचार केले.

तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
Ahilyanagar Crime news: राहुरी तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. तीन अल्पवयीन बहिणींवर तिघाजणांनी सलग पाच वर्षे वेळोवेळी अत्याचार केला. यामध्ये एका महिलेने त्यांना मदत केल्याचे समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या घटनेतील पती-पत्नी काही वर्षापूर्वी विभक्त झाले. त्यावेळी त्यांना चार मुली होत्या. एका मुलीचे लग्न झाले होते. तीन मुलींना त्यांच्या वडिलांनी एका नातेवाईकाच्या स्वाधीन केले होते.
2020 पासून मुलींवर अत्याचार
नातेवाइकाने त्या तीन मुलींच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांच्यावर २०२० पासून आजपर्यंत वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. यासाठी त्यांना एका महिलेने मदत केल्याचे समोर आले.
मोठ्या बहिणीने पोलीस ठाण्यात घेतली धाव
पीडित तीन मुलींपैकी एकीने ही बाब मोठ्या बहिणीला सांगितली. त्यानंतर मोठ्या बहिणीने आपल्या पीडित दहा, चौदा व सोळा वर्षीय बहिणींना बरोबर घेऊन १७ सप्टेंबरला राहुरी पोलिस ठाणे गाठले.
पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, हवालदार राहुल यादव, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, गणेश लिपने तसेच नायब तहसीलदार बाचकर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पीडित मुलींची सुटका केली.
मोठ्या बहिणीच्या फिर्यादीवरून बजरंग कारभारी साळुंखे, इतर दोघे व एक महिला अशा चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पथकाने आरोपी बजरंग कारभारी साळुंखे याला तत्काळ ताब्यात घेतले आहे. अन्य तीन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू जाधव हे करीत आहेत.