शाळा, विद्यालयांसमोरील पान टपऱ्यांवर महापालिकेचा हातोडा
By अरुण वाघमोडे | Updated: October 13, 2023 16:34 IST2023-10-13T16:30:28+5:302023-10-13T16:34:43+5:30
अनधिकृत लावलेले फ्लेक्स बोर्डही हटविले आहेत.

शाळा, विद्यालयांसमोरील पान टपऱ्यांवर महापालिकेचा हातोडा
अहमदनगर: सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अतिक्रमणविरोधी विशेष मोहिम हाती घेतली असून शाळा, महाविद्यालयांसमोरील गुटखा, मावा, तंबाखू विकणाऱ्या टपऱ्यांवर हातोडा टाकला आहे. तसेच अनधिकृत लावलेले फ्लेक्स बोर्डही हटविले आहेत.
मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख आदित्य बल्लाळ यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख यांच्यासह पथकाने गुरुवारी दुपारपासून शहरातील प्रोफेसर चौक, दिल्ली गेट, सावेडी परिसर आदी ठिकाणचे अनधिकृत फ्लेक्स बोर्ड हटविले. दरम्यान मार्कंडेय विद्यालय, दादा चौधरी विद्यालय, भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय, न्यू आर्ट महाविद्यालय तसेच तारकरपूर परिसर आदी ठिकाणी अतिक्रमित असलेल्या व गुटखा, माव्यांची विक्री करणाऱ्या टपऱ्या काढून टाकल्या. या कारवाईत असेच सातत्य राहणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सांगितले.