शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा
By | Updated: December 5, 2020 04:37 IST2020-12-05T04:37:14+5:302020-12-05T04:37:14+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शाळेतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली असून त्यामुळे पालकांची मात्र धाकधूक ...

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तपासणी अहवालाची प्रतीक्षा
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील शाळेतील नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागली असून त्यामुळे पालकांची मात्र धाकधूक वाढली आहे. शिक्षक, शिक्षकेतरांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी झाली; परंतु ते अहवाल अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे शाळा सुरू होण्यास विलंब होत आहे.
सध्या केवळ शिक्षकांची शाळा भरत असून विद्यार्थ्यांना मात्र शाळेत बोलावता येत नाही. शिक्षकांना कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र असल्याशिवाय विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनाही आता सुटीचा कंटाळा आला असून ऑनलाईन शिक्षणात फारसा इंटरेस्ट नसल्याचे विद्यार्थी सांगतात. काही मुलांकडे मोबाईल नाहीत, अशांना शैक्षणिक अडचणी येत आहेत. अशांना शाळा सुरू झाली पाहिजे, असे वाटते.
एखादा बाधित रुग्ण विद्यार्थी, शिक्षक शाळेत आला तर त्याच्या संसर्गाने आपल्या पाल्य व त्याद्वारे हा आजार थेट आपल्या घरात येऊ शकतो, अशी धाकधूक मनात निर्माण होत असल्याने पालकांनी अद्याप संमतीपत्र देण्यास टाळाटाळ केली असल्याचे बोलले जाते. विद्यार्थ्यांत अशी काही लक्षणे आढळून आली तर पालक व शिक्षक, शाळा यांनी सदरच्या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट जवळच्या आरोग्य उपकेंद्रात करून घ्यावी. त्यासाठी उपकेंद्रासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट कीट पुरवण्यात आल्याची माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या बरवकर यांनी दिली.
कोट..
शाळेतील शिक्षकांना ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरने तपासणी करण्याबाबतची माहिती दिली असून मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून सुरक्षित अंतर राखले, तर कोरोना संसर्गापासून बचाव करता येतो. याची खबरदारी शाळेत शिक्षक व घरी पालकांनी घेतली, तर संसर्ग व रोगाचा प्रसार याला आपण अटकाव घालू शकतो.
-डॉ. विद्या बारवकर,
समुदाय आरोग्य अधिकारी, सुपा