शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:16 IST2024-12-01T10:15:39+5:302024-12-01T10:16:07+5:30
एका शिक्षकाने मुख्याध्यापकाला थेट बिष्णोई गँगची धमकी दिली आणि चांगलीच पळापळ झाली.

शिक्षकांच्या दारू पार्टीत राडा; एकाने मुख्याध्यापकाला दिली थेट बिष्णोई गँगची धमकी
अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील कोतूळ येथे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली. एका शिक्षण संस्थेच्या सतरा ते अठरा शिक्षकांच्या पार्टीत मोठा राडा झाला आणि भांडण विकोपाला गेले. त्यानंतर एका शिक्षकाने मुख्याध्यापकाला थेट बिष्णोई गँगची धमकी दिली आणि चांगलीच पळापळ झाली.
अकोले तालुक्यात तीन माध्यमिक विद्यालये असलेल्या एका शिक्षण संस्थेच्या चार शिक्षकांच्या शिक्षक मान्यता सेवा निवृत्तीच्या शेवटच्या टप्प्यात मिळाल्या. मास्तर म्हणून मान्यता मिळाल्याप्रीत्यर्थ पार्टी आयोजित केली. शनिवारी सकाळी बारा वाजता शाळा सुटली. कोतुळ- भोळेवाडी रस्त्यावर एका हॉटेलात ही पार्टी झाली. पार्टीत सर्व निमंत्रित हजर होते. ही संख्या बावीस इतकी होती, पैकी पाचजणांनी तीन प्रकारचे बॅण्ड मनसोक्त रिचविले. आपापल्या पदाच्या कॅटेगरीनुसार कुणी रूममध्ये, तर कुणी बाहेर बसले होते. पेगवर पेग रिचवले जात असताना दुपारी दोनच्या दरम्यान एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक यांच्यात चांगलीच जुंपली, मात्र मुख्याध्यापकापेक्षा शिक्षक वरचढ ठरला. त्याने थेट मुख्याध्यापकाला बिष्णोई गँगची धमकी दिली. यानंतर मुख्याध्यापकाने न जेवता पार्टीतून पळ काढला. हे सुरू असताना याच हॉटेलात जेवण करायला आलेल्या ग्राहकांनी हे तर्र शिक्षक आणि त्यांची भाषा सर्व प्रकार पाहिला. कमी शिक्षण असलेल्या या प्रत्यक्षदर्शीने प्रकार 'लोकमत'ला सांगितला आणि "खरंच यांच्या हाताखाली पोरं कशी शिकतील? " असा प्रश्न केला.
संस्थाचालक काय कारवाई करणार ?
या पार्टीत कोण-कोण होते ? हे शोधायचे असेल तर संबंधित हॉटेलातील सीसीटीव्ही, तसेच संबंधित हॉटेलजवळ एका शॉपिंग कॉम्प्लेक्समध्येदेखील सीसीटीव्हीत या पार्टीत सहभागी लोकांचे दुचाकी व चारचाकी वाहने कैद आहेत. आता संस्थाचालक काय कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे.