नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 13:24 IST2024-11-26T13:20:26+5:302024-11-26T13:24:32+5:30
विकृत मनोवृत्तीच्या प्राध्यापकाने एका विद्यार्थिनीबरोबर व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड झाले.

नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
Akole Crime ( Marathi News ) : अकोले इथं एका नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाने आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीबरोबर अश्लील चॅटिंग केल्याचे उघड होताच या प्राध्यापकास विद्यार्थ्यांनी व संबंधित विद्यार्थिनीच्या पतीने महाविद्यालयात येऊन जाब विचारला. संबंधित प्राध्यापकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विविध संघटनांनी अकोले शहर बंद करत महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी आंदोलकांनी प्राध्यापकास तातडीने निलंबित करण्याची मागणी केली.
या विकृत मनोवृत्तीच्या प्राध्यापकाने संबंधित विद्यार्थिनीबरोबर व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग केल्याचे सबळ पुरावे हाती लागल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीचा पती, नातेवाईक व विद्यार्थी यांनी प्राध्यापकास विचारणा केली. तेव्हा प्राध्यापकाने अरेरावी केल्याच्या कारणावरून गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाच्या अंगावर शाई फेकली व निषेध केला. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. एका समूहाचे हजारो तरुण महाविद्यालयासमोर जमा झाले. निषेधाच्या घोषणा देत संबंधित प्राध्यापकास तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.
अकोले शहर बंदचे आवाहन करताच काही क्षणांत अकोल्यातील व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद करण्यात आली. शहरातील महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंदू रक्षक संघटनेचे सोपान गाडे, भाजपाचे सीताराम भांगरे, बाबासाहेब नाईकवाडी, राहुल ढोक, रमेश राक्षे, दत्ता नवले, संदीप शेणकर यांची भाषणे झाली. नंतर पोलिस ठाण्यात जाऊन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
कारवाईचे आश्वासन
संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने लवकरच विश्वस्त समितीची बैठक घेऊन प्राध्यापकास निलंबित करण्याची कारवाई करू, असे पोलिस ठाण्यात जमलेल्या समुदायास आश्वासित केल्यावर समुदाय शांत झाला.