शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:45 IST2026-03-03T18:42:37+5:302026-03-03T18:45:32+5:30
पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर पोलिसांनी शिक्षकाला केली अटक

शिक्षकी पेशाला काळिमा! विद्यार्थिनीच्या एकटेपणाचा फायदा घेत नराधम शिक्षकाचा अत्याचार, दोन वर्षांपासून सुरु होता छळ
Ahilyanagar Crime: शिक्षकानेच वासनांध होऊन एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची घटना अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात घडली. अमोल बाबासाहेब भोसले (वय २३) असे या नराधम शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मानसिक आधाराच्या नावाखाली खेळ
पीडित मुलगी ग्रामीण भागातील एका खासगी शाळेत आठवीत शिक्षण घेत आहे. घरगुती कारणांमुळे आणि कुटुंबात अपेक्षित प्रेम मिळत नसल्याच्या भावनेतून ती अनेकदा शाळेत आणि वर्गात एकटीच विचार करत असायची. वडील माझ्यापेक्षा भावाचे जास्त लाड करतात, या भावनेतून ती मानसिकदृष्ट्या खचलेली होती. तिच्या याच भावनिक स्थितीचा फायदा आरोपी शिक्षक अमोल भोसले याने घेतला. सुरुवातीला मैत्रीच्या बहाण्याने जवळीक साधून त्याने मुलीचा विश्वास संपादन केला.
दोन वर्षांपासून सुरू होता छळ
आरोपीने पीडितेच्या आईच्या मोबाईलवरून संपर्क साधून तिला जाळ्यात ओढले. १० डिसेंबर २०२४ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत, जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा हा शिक्षक तिच्या घरी जाऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करत असे. आई-वडील कामावर आणि भाऊ कॉलेजला गेलेला असतानाचा वेळ साधून हा नराधम तिचे शोषण करत होता.
पोटदुखीने उघडले पाप
गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला सतत पोटदुखीचा त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय तपासणी केली असता, अवघ्या आठवीत शिकणारी ही मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.
पोलिसांची कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपी अमोल भोसले याला संगमनेर तालुक्यातून अटक केली आहे. त्याच्यावर बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलमे लावण्यात आली आहेत. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, अशा नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरांतून केली जात आहे.