सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:34 IST2025-01-09T14:25:37+5:302025-01-09T14:34:37+5:30

जातीय द्वेषापासून राज्य वाचवले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असंही या नेत्याने म्हटलं आहे.

Suresh Dhas Anjali Damania should stop defaming the Vanjari community says sharad pawar ncp leader pratap dhakne | सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य

सुरेश धस, अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी; पवारांच्या पक्षातील नेत्याचं वक्तव्य

Beed Murder Case : "बीड जिल्ह्यात एकाच जातीचे लोक नोकरीला असल्याचा मुद्दा उपस्थित करून वंजारी समाजाविषयी संशय निर्माण केला जात आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा पद्धतीने एका विशिष्ट समाजाची बदनामी करणे योग्य नाही. आमदार सुरेश धस व सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाची बदनामी थांबवावी," असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि पाथर्डीतील नेते अॅड. प्रताप ढाकणे यांनी व्यक्त केलं आहे. 

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आमदार सुरेश धस यांनी बिंदुनामावलीचा मुद्दा उपस्थित केल्याने वंजारी समाज आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे ढाकणे यांनी बुधवारी अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन धस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "सरपंचाची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही धस यांची मागणी योग्य आहे. त्यांच्या मागणीला पाठिंबाच आहे. कारण गुन्हेगाराला जात नसते. गुन्हेगार गुन्हेगारच असतो; पण या घटनेचे काही लोक राजकारण करत आहेत, हे योग्य नाही, विशिष्ट एका समाजाविषयी गैरसमज निर्माण केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत काहींना चांगले वाटत असले तरी याचे दुरगामी परिणाम होणार आहेत. दोन समाजांत एकमेकांविषयी विष पेरले जात आहे. राजकीय नेत्यांनी त्याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. राजकीय नेते भावनेच्या भरात बोलत असतात; परंतु धस हे जाणीवपूर्वक बोलत आहेत. धस राजकीय नेते आहेत; पण अंजली दमानिया यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजसेविकाही बिंदुनामावलीचा मुद्दा उपस्थित करत आहेत, हे दुर्दैवी आहे," असेही ढाकणे म्हणाले. 

"बीड जिल्ह्यात वंजारी समाजाची संख्या मोठी आहे. वंजारी समाजाला राज्यघटनेने आरक्षण दिलेले आहे. वंजारी समाजाचे तरुण अभ्यासू, मेहनती आणि जिद्दी आहेत. त्यांचा बुद्ध्यांक चांगला आहे. त्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळतात, वंजारी समाजाने कुणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला. त्यांचे पाथर्डीत जोरदार स्वागत केले. वंजारी समाज आरक्षणाच्या वादात पडला नाही, तरीही वंजारी समाजाला ठरवून बदनाम केले जात आहे. मी स्वतः पुरोगामी आहे. नुसताच पुरोगामी नाही तर कृतीने पुरोगामी आहे; पण आपल्या जातीची कुणी बदनामी करत असेल तर भूमिका मांडली पाहिजे. अशा वक्तव्यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वी कधीही अशा घटना घडलेल्या नाहीत; परंतु अलीकडे जातीय द्वेष पसरवला जात आहे," असा आरोपही प्रताप ढाकणे यांनी केला आहे.

पक्षालाही जाब विचारणार 

आमदार सुरेश धस यांना तुमच्याच पक्षाचे नेते घेऊन फिरत असल्याबाबत पत्रकारांनी विचारले. यावर प्रताप ढाकणे म्हणाले, "पक्षाची मुंबई येथे बैठक आहे. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांना जाब विचारणार आहे. अशा जातीय द्वेषापासून राज्य वाचवले पाहिजे. ही सर्वांचीच जबाबदारी आहे."


 

Web Title: Suresh Dhas Anjali Damania should stop defaming the Vanjari community says sharad pawar ncp leader pratap dhakne

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.