कोर्टाच्या आवारात मारहाण, चौघांना शिक्षा
By Admin | Updated: May 11, 2014 00:54 IST2014-05-11T00:49:10+5:302014-05-11T00:54:45+5:30
अहमदनगर : राहुरी येथील न्यायालयाच्या आवारात फिर्यादी असलेल्या जावयास आरोपी असलेल्या सासू,पत्नी, दोन मेव्हणे यांनी मारहाण आणि शिविगाळ केली होती

कोर्टाच्या आवारात मारहाण, चौघांना शिक्षा
अहमदनगर : राहुरी येथील न्यायालयाच्या आवारात फिर्यादी असलेल्या जावयास आरोपी असलेल्या सासू,पत्नी, दोन मेव्हणे यांनी मारहाण आणि शिविगाळ केली होती. या कारणावरून चौघांना राहुरी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रा.न. वानवाडी यांनी प्रत्येकी एक महिना कैद आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी सुधीर सुखदेव भालेराव (रा. नागापूर) हा कामानिमित्त राहुरी येथील न्यायालयात गेला होता. तेथे पत्नी मंदा सुधीर भालेराव हिने फिर्यादीविरुद्ध पोटगीचा दावा दाखल केलेला होता. त्यामध्ये पैसे न भरण्याचा राग आल्याने फिर्यादीची सासू चंद्रभागा सूर्यभान पवार, पत्नी मंदा सुधीर भालेराव व तिचे दोन भाऊ रवींद्र सूर्यभान पवार, देविदास सूर्यभान पवार (रा. राहुरी खुर्द) यांनी फिर्यादी सुधीर यास न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ व लाथाबुक्क्याने मारहाण केली होती. फिर्यादी सुधीर हा जीव वाचविण्यासाठी तत्कालीन न्यायाधीश खेडेकर यांच्याकडे पळाला आणि त्याने हकीकत सांगितली. न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणी फिर्याद देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी फिर्याद दिली नसल्याने फिर्यादिने राहुरी न्यायालयात अॅड. काकासाहेब तांदळे यांच्यामार्फत खासगी फिर्याद दाखल केली. या प्रकरणामध्ये फिर्यादिची व साक्षीदार जयराम चौधरी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अॅड. ए.पी. मैड यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरून चारही आरोपींना शिक्षा केली. दंडामधील निम्मी रक्कम फिर्यादिस देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)