धक्कादायक! विवाहित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्या १२ वर्षीय मुलाचे पुण्यातून अपहरण करून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 19:53 IST2024-12-26T19:02:48+5:302024-12-26T19:53:26+5:30
अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेत होते.

धक्कादायक! विवाहित प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी तिच्या १२ वर्षीय मुलाचे पुण्यातून अपहरण करून हत्या
संगमनेर : पुणे जिल्ह्यातील अपहरण झालेल्या १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी संगमनेर तालुक्याच्या गुंजाळवाडी गावच्या शिवारातील विहिरीत आढळून आला. त्याच्या अपहरण प्रकरणी संगमनेरातील २७ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल असताना त्याचाही मृतदेह मंगळवारी सकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या दोन्ही घटनांप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. मात्र २७ वर्षीय तरुणाने आपली विवाहित प्रेयसी आणि तिच्या पतीला धडा शिकवण्यासाठी या १२ वर्षीय मुलाची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.
अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी मुलाचे अपहरण झाल्याची फिर्याद ११ डिसेंबरला पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात दिली होती. दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्या मुलाला आमिष दाखवून माझे कायदेशीर रखवालीतून माझ्या संमतीशिवाय पळवून नेले आहे, असेही वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
११ डिसेंबरला दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास मौजे निरगुडसर गावच्या हद्दीतील एका विद्यालयातून आरोपीने विद्यार्थ्याचे अपहरण केले होते. आरोपी हा संगमनेरातील रहिवासी असल्याने पारगाव कारखाना पोलिस संगमनेरात तपासासाठी आले होते. अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील पोलिस अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचा शोध घेत होते. दरम्यान, १३ दिवसांनी गुंजाळवाडी गावच्या हद्दीतील एका विहिरीत सदर विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याचे शाळेचे ओळखपत्र देखील पोलिसांना विहिरीजवळ मिळून आले.
दरम्यान, तरुणाचा मृतदेह आढळून आलेल्या ठिकाणी पोलिसांना चिठ्ठी मिळून आली. त्यात काहींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलाचा विहिरीत आणि त्याच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे या दोन्ही घटनांचा तपास पारगाव कारखाना आणि संगमनेर शहर या दोन्ही पोलिसांनी संयुक्तरीत्या करून नेमका काय प्रकार घडला असावा? याचा शोध सुरू आहे.