सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:19 IST2025-10-23T06:19:21+5:302025-10-23T06:19:21+5:30
मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता.

सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी: ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त मंगळवारी रात्री साईनगरी दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन निघाली. या अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढविण्यात आले होते.
कार्यकारी संस्थानचे मुख्य अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी साई मंदिरात लक्ष्मी पूजन झाले. हिरेजडित मुकुट, लाल मखमली शाल आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बाबांचे लोभस रूप अधिकच तेजस्वी दिसत होते.
मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता. सायंकाळी ५ वाजता मुख्य पूजनाला सुरुवात झाली, तेव्हा काही काळासाठी दर्शनरांग थांबवून सारा आसमंत केवळ भक्तिरसात न्हाऊन निघाला. सायंकाळी ६ वाजता झालेल्या धुपारतीने या भक्तिमय सोहळ्यात आणखीच चैतन्य भरले.
साईबाबांचे ऐश्वर्य
सुवर्ण ५०० किलोपेक्षा अधिक,
चांदी ७,००० किलोपेक्षा अधिक
बँक ठेवी ३,३०० कोटी रुपये