द्वारकामाईत प्रकटले साई?; हजारो भक्तांना दिसला बाबांचा चेहरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:04 IST2018-07-12T15:00:47+5:302018-07-12T15:04:15+5:30
बुधवारी (11 जुलै) मध्यरात्री द्वारकामाईत सार्इंची प्रतिमा अवतरल्याने साईभक्तांसह अवघी शिर्डी हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी द्वारकामाईत लोटली.

द्वारकामाईत प्रकटले साई?; हजारो भक्तांना दिसला बाबांचा चेहरा
शिर्डी - समाधीच्या शंभर वर्षानंतरही साईबाबांचं अस्तित्व व प्रचिती कायम आहे. फक्त श्रद्धा व सबुरी या बाबांच्या शिकवणुकीवर विश्वास हवा. यामुळेच जगभरातून भक्तांची मांदियाळी आवर्जून साई दरबारी हजेरी लावत असते. बुधवारी (11 जुलै) मध्यरात्री द्वारकामाईत सार्इंची प्रतिमा अवतरल्याने साईभक्तांसह अवघी शिर्डी हा आनंद सोहळा अनुभवण्यासाठी द्वारकामाईत लोटली. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचं वास्तव्य द्वारकामाई मशिदीत घडलं. त्यांनी अखेरचा श्वासही येथेच घेतला. त्यामुळे अ•यासु भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुधवारी मध्यरात्री द्वारकामाईतील कोनाड्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याचं म्हटलं जात आहे. हा कोनडा बाबांच्या हयातीपासून आहे. या कोनाड्यात बाबा दिवा लावत, आजही या कोनाड्याला पुजारी रोज हार घालतात. नेमकं याच ठिकाणी बाबांचं दर्शन झाल्याचं म्हटलं जातं आहे. यापूर्वीही येथे बाबांची प्रतिमा दिसल्याचे बोललं जातं.
याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असतानाच बघता बघता हे वृत्त शहरात पसरलेय. यानंतर काही क्षणातच द्वारकामाई परिसर भाविक व ग्रामस्थांनी खचाखच भरुन गेला. गर्दी नियंत्रणात आणताना सुरक्षा रक्षकांना नाकीनऊ आले. अनेकांच्या डोळ्यात हे दृश्य बघून आनंदाश्रू आले. साईनामाने अवधी साईनगरी भल्या मध्यरात्री दुमदुमून गेली. अनेकांनी या दृष्याचे चित्रिकरण केले, फोटो काढले, लगेचच ही घटना फोटो व व्हिडीओसह सोशल मीडियावर व्हायरल झाली. सकाळपर्यंत जगभरातील लाखो भाविकांपर्यत हे वृत्त पोहोचले. सकाळीही द्वारकामाईत नेहमीपेक्षा अधिक मोठ्या रांगा लागल्या होत्या. सार्इंच्या या प्रतिमेचे दर्शन बुधवारी रात्री 11.30 ते 12.30 पर्यंत असे तासभर घडले. त्यानंतर ही प्रतिमा विरळ होत नाहीशी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या साईबाबांचे समाधी शताब्दी वर्ष सुरू असून शेवटचे 100 दिवस क्षिल्लक आहेत. याच काळात ही घटना घडल्याने आगामी काळात भविकांचा ओघ वाढण्याची चिन्हे आहेत.