पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 06:36 IST2025-01-13T06:35:42+5:302025-01-13T06:36:13+5:30

Amit Shah : अमित शाह यांचा ‘विश्वासघाताच्या राजकारणा’वर शिर्डीच्या भाजप अधिवेशनात घणाघात

Sharad Pawar, Uddhav Thackeray's Politics Of Betrayal Ended By Maharashtra Assembly Polls Victory, Says Amit Shah At BJP Convention In Shirdi | पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

पवार, ठाकरेंचे राजकारण महाराष्ट्राने गाडले, इंडिया आघाडीचे तीनतेरा वाजणे सुरू; अमित शाहांचा घणाघात

शिर्डी : शरद पवार यांनी १९७८ मध्ये सुरू केलेले आणि उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये केलेले विश्वासघाताचे राजकारण महाराष्ट्रातील 
मतदारांनी जमिनीखाली २० फूट गाडून टाकले. विधानसभा निवडणूक निकालांनी राज्यातील अस्थिर राजकारणालाही मूठमाती दिली आणि भाजप-महायुतीला प्रचंड बहुमत देऊन विरोधकांची सत्तेत येण्याची स्वप्ने धुळीस मिळवली, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी येथे केला.

रविवारी भाजपच्या एक दिवसाच्या अधिवेशनाचा समारोप अमित शाह यांच्या भाषणाने झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सचिव पंकजा मुंडे, शिवप्रकाश, प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, संमेलनाचे आयोजक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, अशोक चव्हाण यांच्यासह मंत्री, ज्येष्ठ नेते या वेळी उपस्थित होते.

शरद पवार यांच्यामागे महाराष्ट्राचा एक नकाशा आहे आणि पत्रकारांना ते विजयाचे गणित समजावत असल्याचा एक फोटो मी पाहिला होता. आता मी पवारांना समजावतो असे सांगत शाह यांनी राज्याच्या विविध भागांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाची आकडेवारीच दिली. 

विजयासाठी पूर्ण ताकद लावा...
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी पूर्ण ताकद लावा, विरोधकांना एकही जागा मिळता कामा नये. ‘पंचायत से पार्लमेंट तक’ भाजपलाच जिंकवायचे आहे याचा निर्धार करा, असे ते म्हणाले. 
शरद पवार सहकार क्षेत्रातील बडे नेते, केंद्रात मंत्रीही होते. पण ते शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत. जे दावे करत होते त्यांचा सफाया झाला, असेही शाह म्हणाले.

काँग्रेस, भाजपमधील फरक कामातून कळावा : नितीन गडकरी
भाजपने विधानसभा निवडणुकीत यशाचे सुवर्ण शिखर गाठले. मात्र, विजयाचे रूपांतर सुराज्यामध्ये करण्याची आता जबाबदारी आहे. काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे आले, यातील फरक जनतेला सांगता आला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. केवळ निवडणुकीतील यशाने मोठेपण येत नाही, असे ते म्हणाले.

अमित शाह मैदानात उतरले अन् विधानसभेत चांगले यश मिळाले
विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. आमचे नेते अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाने आलेली आमच्यातील निराशा घालविली, ते स्वत: मैदानात उतरले, आमच्यासोबत लढाई लढले, या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. 

Web Title: Sharad Pawar, Uddhav Thackeray's Politics Of Betrayal Ended By Maharashtra Assembly Polls Victory, Says Amit Shah At BJP Convention In Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.