शरद पवार निलेश लंकेच्या 2 खोल्यांच्या घरात, कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 16:07 IST2021-10-02T16:05:02+5:302021-10-02T16:07:20+5:30
अहमनदनगरमधील विकासकामांचा लोकार्पण सोहळा पवार-गडकरी जोडीमुळे लक्षवेधी ठरला. त्यानंतरही, शरद पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय बनला आहे.

शरद पवार निलेश लंकेच्या 2 खोल्यांच्या घरात, कार्यकर्त्यांची गर्दी जमली दारात
अहमदनगर/मुंबई - अहमदनगर जिल्ह्यात आज ३ हजार २८ कोटींच्या महामार्गाचं भूमीपूजन तर १ हजार ४६ कोटींच्या महामार्गाचं लोकार्पण झालं. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विखे परिवार एकाच मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात पवारांनी गडकरींच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. त्यानंतर, गडकरींनी भाजपाचे दिवंगत नेते माजी खासदार दिलीप गांधी यांची आठवण जागवली. गांधी यांच्या कुटुबींयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार असल्याचंही ते म्हणाले. तर, इकडे शरद पवार यांनी आमदार निलेश लंकेंच्या घरी भेट दिली.
अहमनदनगरमधील विकासकामांचा लोकार्पण सोहळा पवार-गडकरी जोडीमुळे लक्षवेधी ठरला. त्यानंतरही, शरद पवार यांच्या पारनेर दौऱ्यामुळे हा सोहळा चर्चेचा विषय बनला आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे साधे राहणीमान आणि साधे घर नेहमीच चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही लंके यांच्या पारनेर तालुक्यातील हंगा येथील घराला आज भेट दिली. त्यावेळी आमदार लंके यांच्या आई-वडिलांची पवार यांनी आस्थेने चौकशी केली.
आमदार लंके यांनी कोरोना काळात केलेले काम देशपातळीवर चर्चेत आले होते. तसेच लंके यांचा साधेपणा, त्यांचे साधे घर यावरही चर्चा झाली होती. शरद पवार यांनी आज थेट लंके यांच्या 2 खोल्यांच्या घरी भेट दिली. त्यामुळे कार्यकर्तेही भारावले. लंकेच्या अत्यंत साध्या घरात पवार गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदालाही उधाण आले होते. लंकेच्या घरात शरद पववार होते, तर दारात कार्यकर्त्यांच मोठी गर्दी जमा झाली होती. पवार यांच्या बाजुला आमदार लंके यांचे आई-वडिल होते, त्यांचीही पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यावेळी लंके यांच्या मुलीनेही शरद पवार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी लंकेंच्या मुलांना त्यांच्या शिक्षणाबाबत पवारांनी विचारपूस केली. यावेळी, कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हेही हजर होते.
दरम्यान, नितीन गडकरी यांनीही जुने सहकारी दिलीप गांधी यांची आठवण जाहीर सभेत काढली. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास मी त्यांच्या घरी जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.