भिंगार : भिंगार येथील छावणी परिषद शाळेने ‘शाळा आपल्या भागात’ या सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाला पालकांसह विद्यार्थीही चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे मुलांची शिक्षणातील गोडीही कायम राहिली आहे.
१८ जूनपासून हा उपक्रम सुरू आहे. काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशाने विद्यार्थीबहुल भागातील मंदिर, सार्वजनिक जागेत वर्गाप्रमाणे वेळापत्रक तयार करून इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दररोज एक तास अध्यापन केले जात आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास अभ्यासाचा सराव करण्यासाठी नियमित स्वाध्याय देण्यात येत आहे.
इयत्ता दुसरीच्या मुलांचा नियमित गृहभेटीद्वारे अभ्यास करून घेतला जात आहे. तसेच इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांना पालकांच्या माध्यमातून दररोज अभ्यास देण्याचे नियोजन शाळेने केले आहे. या उपक्रमाची माहिती प्रभारी मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी दिली. हा उपक्रम छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांच्या संकल्पनेतून राबविला जात आहे. सर्व शिक्षकांच्या सहकार्यातून राबवत असलेल्या या उपक्रमास पालकांसह विद्यार्थीही चांगला प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.
-----
छावणी परिषद शाळेतील शिक्षक आमच्या मुलांच्या अभ्यासाचे नुकसान होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. ते आमच्या भागातील मुलांचा गट करून अध्यापन करत आहेत. नियमित स्वाध्याय देत आहेत. त्यामुळे आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान कमी प्रमाणात होईल.
- मनीषा प्रशांत जोशी,
पालक, भिंगार
----
२३ भिंगार
भिंगार येथील एका मंदिरात त्या भागातील मुलांना शिकविताना छावणी परिषदेचे शिक्षक.