Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:25 IST

April 2026 WPI Inflation Data: भारतात महागाईनं पुन्हा एकदा डोकं वर काढले असून एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे.

April 2026 WPI Inflation Data: भारतात महागाईनं पुन्हा एकदा डोकं वर काढले असून एप्रिल महिन्यात घाऊक महागाई दरात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये घाऊक महागाईचा दर ८.३% वर पोहोचला आहे. गेल्या ४२ महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर असून पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हे याचं मुख्य कारण आहे.

एप्रिलमध्ये महागाईचा मोठा आलेख

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च २०२६ मध्ये हा दर ३.८८% होता, जो एप्रिलमध्ये थेट ८.३०% वर गेला आहे. अवघ्या एका महिन्यात झालेली ही वाढ चिंताजनक मानली जात आहे. विशेषतः इंधन, वीज आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे या निर्देशांकात तेजी आली. घाऊक महागाईच्या 'फ्यूल अँड पॉवर' श्रेणीमध्ये एप्रिलमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मार्चमध्ये या श्रेणीतील महागाई अवघी १.०५% होती, जी एप्रिलमध्ये वाढून २४.७१% झाली आहे.

केविन वॉर्श बनले अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे नवे अध्यक्ष, आता व्याजदर कमी होणार का? महागाई रोखण्याचंही आव्हान

कच्च्या तेलाच्या दरात ८८% वाढ

मध्य पूर्वेतील संकट आणि 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधील विस्कळीत पुरवठ्यामुळे भारताला आयात कराव्या लागणाऱ्या तेलाच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या क्षेत्रातील महागाई एप्रिलमध्ये ८८.०६% वर पोहोचली आहे, जी मार्चमध्ये ५१.५% होती. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करत असल्यानं जागतिक किमतींचा थेट परिणाम देशांतर्गत महागाईवर होत आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसची स्थिती

इंधनाशी संबंधित उत्पादनांमध्ये महागाईचं प्रमाण खालीलप्रमाणे वाढले आहे:

पेट्रोल : मार्चमधील २.५०% वरून थेट ३२.४०% वर पोहोचलं.
डिझेल (HSD): ३.२६% वरून २५.१९% वर गेलं.
एलपीजी : मार्चमध्ये -१.५४% असलेला दर एप्रिलमध्ये १०.९२% वर आला.

किमती स्थिर ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या असूनही सरकारनं अद्याप पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किरकोळ किमतीत मोठी वाढ केलेली नाही. मात्र, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

अन्नधान्य महागाईत किरकोळ वाढ

खाद्यपदार्थांच्या महागाईत फार मोठी वाढ झालेली नाही. मार्चमधील १.९०% वरून अन्नधान्य महागाई एप्रिलमध्ये १.९८% झाली आहे. मात्र, बिगर-खाद्य वस्तूंची महागाई १२.१८% वर पोहोचली आहे.

सरकारनं दिलेली प्रमुख कारणं

खनिज तेलाच्या किमती वाढणं.
कच्चं तेल आणि नैसर्गिक वायू महाग होणं.
धातूंच्या किमतीत झालेली वाढ.
मॅन्युफॅक्चरिंग उत्पादनांचा खर्च वाढणं.

मध्य पूर्वेतील संकटाचा मोठा परिणाम

मध्य पूर्वेतील संघर्षामुळे भारतासारख्या तेल आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर दबाव वाढला आहे. कच्चं तेल महाग झाल्यामुळे वाहतूक, वीज आणि उत्पादन खर्च वाढतो, ज्याचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर होतो. जर कच्च्या तेलाचे दर असेच चढे राहिले, तर येणाऱ्या काळात खाण्यापिण्याच्या वस्तू, गॅस आणि इतर जीवनावश्यक वस्तू अधिक महाग होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Inflation Surge: Wholesale Prices Hit 42-Month High, Fuel Costs Soar

Web Summary : India's wholesale inflation surged to 8.3% in April 2026, a 42-month peak, driven by rising fuel and crude oil prices. Crude oil prices increased by 88%. The Middle East crisis exacerbates import costs, threatening higher prices for essential goods.
टॅग्स :महागाईपैसा