साईबाबा संस्थानची पत्रकारांवर सूड भावनेतून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:35+5:302021-02-05T06:36:35+5:30

संगमनेर : कोरोनाच्या नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन ...

Sai Baba Sansthan takes revenge action against journalists | साईबाबा संस्थानची पत्रकारांवर सूड भावनेतून कारवाई

साईबाबा संस्थानची पत्रकारांवर सूड भावनेतून कारवाई

संगमनेर : कोरोनाच्या नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणाऱ्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे, असे निवेदन सोमवारी (दि.१) संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांना देण्यात आले.

मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, सचिव गोरक्षनाथ मदने, सदस्य आनंद गायकवाड, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, अंकुश बुब, अमोल मतकर, राजू नरवडे, सतीश आहेर, सोमनाथ काळे, निलिमा घाडगे, भारत रेघाटे, बाबासाहेब कडू, सुनील महाले, संजय साबळे, काशिनाथ गोसावी व सुशांत पावसे आदी यावेळी उपस्थित होते. १६ नोव्हेंबर २०२० ला मंदिरे उघडल्याने कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत मोठी गर्दी होणार हे निश्‍चित असल्याने विविध वृत्तवाहिन्यांचे व मुद्रित माध्यमांचे प्रतिनिधी मंदिरे उघडली, त्या दिवशी शिर्डीत वार्तांकन करीत होते. त्याप्रमाणे एका वृत्तवाहिनीचे मुकुल कुलकर्णी व नितीन ओझा हे दोघेही आपल्या कॅमेरामनसोबत मंदिराच्या मागील बाजूस गुरुस्थानाजवळ साईंचे दर्शन घेऊन बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या प्रतिक्रिया घेत होते. याच दरम्यान संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे तेथे आले व त्यांनी कोणतीही विचारपूस न करता माध्यमांच्या प्रतिनिधींवर आगपाखड करायला सुरुवात केली व सर्वांना संस्थानच्या आवारातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यानुसार तेथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार तेथून बाहेर पडले. त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरित मागे घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे. पत्रकारांनी काळ्या फिती लावून साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा निषेधही नोंदविला.

-------------

फोटो नेम : ०१०२२०२१ संगमनेर पत्रकार मंच निवेदन

ओळ : संगमनेर पत्रकार मंचच्यावतीने उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Sai Baba Sansthan takes revenge action against journalists