अकोलेतील रस्त्यांच्या कामांना होईना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:36+5:302021-06-10T04:15:36+5:30
तालुक्याची पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या भंडारदरा-रतनवाडी-घाटघर-पांजरे-मुरशेत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रिंग रोडवरील एका बाजूला भंडारदरा-रतनवाडी हा ...

अकोलेतील रस्त्यांच्या कामांना होईना सुरुवात
तालुक्याची पर्यटनाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या भंडारदरा-रतनवाडी-घाटघर-पांजरे-मुरशेत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रिंग रोडवरील एका बाजूला भंडारदरा-रतनवाडी हा रस्ता तर दुसऱ्या बाजूला असणारा फॉरेस्टचा चेकनाका ते घाटघरकडे जाणारा रस्ता. या दोन्ही बाजूंच्या रस्त्याच्या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मार्च महिन्यात राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदारांना कार्यरंभ आदेश दिले. मार्च महिन्यात काम सुरू करण्याचे आदेश देऊनही काम करणाऱ्या यंत्रणांनी अद्यापही कामे सुरू केलेली नाहीत. याबरोबर चिचोंडी - धनगर वाडी या जोड रस्त्यावर असणाऱ्या ओढ्यातूनच पावसाळ्यात अनेक नागरिक आणि शाळेत जाणारी मुले येजा करत असतात. या ओढ्यावर पूल बांधण्यासाठी सुमारे ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या पुलाच्या कामाचाही आदेश मार्च महिन्यातच झालेला असतानाही हे कामही सुरू झालेले नाही. त्यामुळे या वर्षीही या नागरिकांना आणि शाळकरी मुलांना पावसाळ्यात या धोकादायक ओढ्यातून प्रवास करावा लागणार आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या गावाकडे जाणाऱ्या खडकी-लव्हाळी-पाचनई या रस्त्याच्या कामाचाही आदेशही मार्च महिन्यात झालेला असतानाही हेही काम अद्याप सुरू झाले नाही.
या रस्त्यांच्या आणि पुलाच्या कामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. कार्यारंभ आदेशही ठेकेदारांना दिलेले आहेत. असे असतानाही ही कामे सुरू झाली नाहीत, कामे सुरू झालेली नसताना सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प बसला आहे.
..................
अनास्थेला कोण जबाबदार
आता पावसाळा सुरू झाला आहे. मंजूर झालेली ही सर्व कामे धो-धो पाऊस कोसळणाऱ्या भागातील आहेत. त्यामुळे ही कामे सध्या तरी सुरू होतील की नाही या बाबत शंका आहे. त्यामुळे यावर्षीही या परिसरातील नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना आणि पर्यटकांना या अडचणींचा सामना करावा लागणार कामे मंजूर असताना आणि कार्यारंभ आदेश दिलेले असतानाही ठेकेदारांच्या अनास्थेला कोण जबाबदार आहे? यांना प्रशासकीय की राजकीय लोक पाठीशी घालत आहेत, हा विषयही या दिरंगाईबाबत महत्त्वाचा आहे.