उपचाराअभावी निवृत्त प्राध्यापकाने गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:32+5:302021-06-10T04:15:32+5:30
श्रीरामपुरातील घटना : रुग्णालयांचा उपचारास नकार श्रीरामपूर : शहरामध्ये असलेल्या रुग्णालयांचे जाळे पाहता चोवीस तासांच्या आत येथे रुग्णांना चांगली ...

उपचाराअभावी निवृत्त प्राध्यापकाने गमावले प्राण
श्रीरामपुरातील घटना : रुग्णालयांचा उपचारास नकार
श्रीरामपूर : शहरामध्ये असलेल्या रुग्णालयांचे जाळे पाहता चोवीस तासांच्या आत येथे रुग्णांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळते, असे बोलले जाते. मात्र रुग्णवाहिका व वैद्यकीय उपचार न मिळाल्याने सेवानिवृत्त प्राध्यापकांना जीव गमवावा लागला.
रयत शिक्षण संस्थेच्या प्रवरानगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक भगीरथ एकनाथ कणसे (वय ६३) यांना सोमवारी रात्री छातीत त्रास झाला. त्यांनी लोणी येथे उपचार घेतला. तिथे त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. उपचारानंतर ते श्रीरामपूर शहरात घरी परतले. मात्र मंगळवारी त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना शहरातील एका ट्रस्टच्या रुग्णालयात नेण्यात आले. मला कोरोना नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार तरी करा, अशी विनंती त्यांनी केली. मात्र येथे आवश्यक वैद्यकीय सुविधा नसल्याने संगमनेरला घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला.
रुग्णवाहिकेसाठी कुटुंबीयांनी संपर्क साधला. मात्र एक तास वाहन उपलब्ध झाले नाही. अखेर रिक्षातून शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथेही तसाच अनुभव आला. अखेर तेथे रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांना रिक्षातूनच लोणीला नेण्यात आले. मात्र प्रवासादरम्यान कणसे यांचे निधन झाले. प्राध्यापक कणसे हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित होते. ते मूळचे मातुलठाण येथील आहेत. सध्या प्रवरा हाउसिंग सोसायटीमध्ये ते वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
------
फोटो आहे : ०९०६ २०२१ भगीरथ कणसे
--------
....