अटी पूर्ण नसताना रुग्णालयांचे नूतनीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:34+5:302021-04-16T04:20:34+5:30
अहमदनगर : संगमनेर शहरातील १०४ खासगी रुग्णालयांकडे ना हरकत प्रमाणपत्र नसताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंत्र्यांच्या शिफारशीवरून या रुग्णालयांच्या बॉम्बे नर्सिंग ...

अटी पूर्ण नसताना रुग्णालयांचे नूतनीकरण
अहमदनगर : संगमनेर शहरातील १०४ खासगी रुग्णालयांकडे ना हरकत प्रमाणपत्र नसताना जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंत्र्यांच्या शिफारशीवरून या रुग्णालयांच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्ट प्रमाणपत्राला दोन वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची शिफारस व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशावरून लोकहितास्तव ही मुदतवाढ दिल्याचे आदेशात म्हटले आहे.
भंडारा व इतर ठिकाणी दवाखान्यात घडलेल्या दुर्घटनांमुळे दवाखाने सर्व अटी शर्ती पूर्ण करतात का? ही बाब महत्त्वाची मानली जाते. बॉम्बे नर्सिंग ॲक्ट प्रमाणपत्राचे नूतनीकरण करताना या अटी-शर्थी पाहिल्या जातात. संगमनेर नगरपालिकेने या रुग्णालयांना ना हरकत प्रमाणपत्र दिलेले नव्हते. त्यामुळे ३१ मार्च २०२१ नंतर या रुग्णालयांचे नूतनीकरण करणे कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे होते.
याबाबत मंत्री थोरात यांनी प्रशासनाकडे शिफारस केली. त्यावरून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाशी चर्चा केली. या शिफारशींवरून या रुग्णालयांकडे ना हरकत प्रमाणपत्र नसले तरी त्यांच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्ट प्रमाणपत्राला मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांनी घेतला आहे. तसा आदेशही काढण्यात आला आहे. थेट दोन वर्षे ही मुदत वाढविण्यात आली आहे. संगमनेर येथील काही रुग्णालयांचे नूतनीकरण न्यायप्रविष्ट आहे. ती प्रकरणे वगळून १०४ रुग्णालयांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे.
..........
रुग्णालये अटी, शर्थी पूर्ण करत नसल्याने नूतनीकरण करता येत नव्हते. मात्र, कोविड परिस्थितीत या रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात यावे, असे पत्र नगरपालिकेने दिले. तसेच मंत्र्यांकडेही याबाबत मागणी आली होती. त्यामुळे कोविडची परिस्थिती विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा लागला. एवढी रुग्णालये बंद ठेवणे याकाळात शक्य नसल्याने हा निर्णय घेतला. रुग्णालये अटी, शर्थी नंतर पूर्ण करतील.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक