राहुरी : राहुरी तालुक्यातील आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव, संक्रापूर, पिंपळगाव फुनगी, गंगापूर परिसरात रविवारी (दि.११) रात्री जोरदार पाऊस झाला. ओढ्या, नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी पुराचे पाणी शेतात घुसले. त्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
रविवारी रात्री आंबी, अंमळनेर परिसरात पावसाचे तांडवनृत्य पहायला मिळाले. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याने ते दुथडी भरून वाहू लागले. पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबी परिसरातील सरई भागात ओढ्यांनी रौद्र रूप धारण केले. ओढ्यांचे पात्र ओलांडून शेतांमधून पाणी वाहिले. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डुकरे वस्तीला पुराचे पाणी खेटले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आंबी-देवळाली, प्रवरा रस्ता पाण्याखाली गेला असून वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
अंमळनेर परिसरातील आंबी-गणेशवाडी रस्ता ओढ्याला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. तेथील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने उभी पिके पाण्यावर तरंगताना पाहण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
.............
ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली आहेत. तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी. पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
-काकासाहेब डुकरे, शेतकरी, आंबी
120721\img-20210712-wa0076.jpg
आंबी-अंमळनेर परिसरात पावसाचे तांडव,ओढ्या-नाल्यांना पूर,शेतीचे अतोनात नुकसान