कोतकरला नाशिक जेलमध्ये ठेवा
By Admin | Updated: July 17, 2014 00:28 IST2014-07-16T23:11:24+5:302014-07-17T00:28:51+5:30
अहमदनगर : लांडे खून प्रकरणाची नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.

कोतकरला नाशिक जेलमध्ये ठेवा
अहमदनगर : लांडे खून प्रकरणाची नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीसाठी मुख्य आरोपी भानुदास कोतकर याला मंगळवारी (दि.१५) नगरच्या जिल्हा रुग्णालयातील न्यायबंदी कोठडीतून नाशिकला वेळेत पोहोचवले नाही. त्यामुळे खटल्याची सुनावणी झाली नाही. सुनावणी प्रक्रियेत प्रवासाचा अडथळा येणार नाही, यासाठी कोतकरची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी केली आहे.
लांडे खून खटल्याची मंगळवारपासून सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी मूळ फिर्यादी शंकर राऊत, साक्षीदार नंदू सुरसे हजर होते. कौटुंबिक कारणामुळे आरोपीचे वकील हजर नव्हते. अंडर ट्रायल आरोपी भानुदास कोतकर हा नगरच्या जिल्हा रुग्णालयातील न्यायबंंदी कोठडीत आहे. त्याला व इतर आरोपींना घेऊन मंगळवारी (दि.१५) सकाळी आठ वाजता पोलिसांचे वाहन निघाले होते. ते वाहन नाशिकच्या न्यायालयात दुपारी दोनवाजेपर्यंत पोहोचले नव्हते. या कामात विस्कळीतपणा असल्याचे स्पष्ट झाल्याची तक्रार राऊत यांनी केली. त्यामुळे कोतकर याला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातच ठेवावे, अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान पॅरिटी ग्राऊंडवर जामीन मिळावा म्हणून कोतकर याच्यातर्फे केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. नाशिक येथे खटल्याची सुनावणी सुरू होणार असल्याने जामीन देऊ नये,असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याने कोतकरचा जामीन फेटाळण्यात आला.
(प्रतिनिधी)