५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 06:40 IST2025-10-05T06:40:50+5:302025-10-05T06:40:59+5:30
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तरुणाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
लोकमत न्यूज नेटवर्क
कुडूस : आदिवासी समाजातील १४ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांना दलालामार्फत ५० हजार रुपये देऊन तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा अमानुष प्रकार वाडा तालुक्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात मुलीच्या पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मध्यस्थी करणारा आरोपी रवी कृष्णा कोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील तरुणाशी मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. लग्नासाठी तिच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आले. लग्नासाठी केलेल्या व्यवहारातील ५० हजार रुपये मुलीचे काही कुटुंबीय आणि दलालाने घेतले. २०२३ मध्ये ती गर्भवती राहिल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. तिला मुलगी झाल्यानंतर तर छळाची तीव्रता आणखी वाढली, असे पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुलीचे वडील हयात नाहीत. आई हयात आहे, मात्र मुलगी काकीकडे राहत होती. तिची काकी वयोवृद्ध आहे. तिच्या नकळत हा व्यवहार करण्यात आला होता, अशी माहिती महाराष्ट्र श्रमजीवी संघटनेचे चिटणीस विजय जाधव यांनी दिली.
आधार कार्डमध्ये फेरफार
पीडिता गर्भवती राहिल्यानंतर नोंदणी करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार करून जन्मतारीख बदलली. मूळ जन्मतारीख १० ऑक्टोबर २००८ असताना तिच्या पतीने ती २० ऑक्टोबर २००३ अशी दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपी कोण? : आरोपींमध्ये तिचा पती जीवन बाळासाहेब गाडे, चुलत सासरा अमोल गाडे, सासरा बाळासाहेब गाडे, दोन चुलत सासवा व एक नातेवाईक महिला यांचा समावेश आहे.
आणखी चार मुलींची विक्री? : वाडा तालुक्यातील कातकरी समाजातील आणखी चार मुलींची एक-सव्वा लाख रुपयांच्या बदल्यात विक्री करून त्यांचे लग्न लावून देण्यात आले आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेने दिली. दलालांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड यांनी दिला.