अहमदनगर : महापालिकेच्या महत्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या परीक्षणासाठी नियुक्त केलेल्या त्रयस्थ संस्थेचा अहवाल नुकताच प्राप्त झाला इााला आहे. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला असून, स्थायीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
शहरातील पथदिवे बदलण्यात येणार आहेत. पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे बसविण्यात येणार आहे. शहरात २५ हजार पारंपरिक पथदिवे आहेत. ते बदलण्यात येणार असून, त्यासाठी दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. शहरातील पथदिव्यांसाठी सध्या किती वीज लागते, याचेही परीक्षण करण्यात आले आहे. औरंगाबाद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या संस्थेकडून अहवाल मिळत नव्हता. त्यामुळे स्मार्ट एलईडी प्रकल्पाचे काम थंडावले होते. महापालिका पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून परीक्षणाचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्मार्ट एलईडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्युत विभागाकडून हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर संबंधित संस्थेला कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील पथदिवे बदलण्यात येणार असून, एलईडी दिवे बसविले जाणार आहेत.
....
- स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या परीक्षणासाठी नेमलेल्या त्रयस्थ संस्थेकडून नुकताच अहवाल प्राप्त झाला आहे. स्थायी समितीची सभा घेऊन प्रकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर शहरातील पथदिवे बदलले जाणार आहेत.
- अविनाश घुले, सभापती, स्थायी समिती.