साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:44 IST2025-08-24T13:44:33+5:302025-08-24T13:44:47+5:30
साईबाबा संस्थानच्या प्रसादासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे

साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे
प्रमोद आहेर
शिर्डी : श्रीसाईबाबांच्या बुंदी लाडू प्रसादाचा भाव ५० टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. पूर्वी वीस रुपयांना मिळणारी दोन लाडूची पाकिटे आता तीस रुपयांना मिळणार आहेत.
संस्थानच्या मते, मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने ही दरवाढ केली आहे. जो प्रसाद श्रद्धेने घरी नेला जातो, भाविकांच्या देणग्यांवर चालणाऱ्या विश्वस्त संस्थेने असा 'व्यावसायिक' दृष्टिकोन ठेवून श्रद्धेच्या प्रतीकातूनच तोटा भरून काढावा का? असा थेट
सवाल भाविक करत आहेत. विशेष म्हणजे, गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडूचे पाकीट (ज्याची वार्षिक विक्री दीड कोटींच्या घरात होती) आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ एकच 'प्रीमियम' पर्याय ठेवला आहे.
एकीकडे मोफत भोजनाचा आणि माफक दरातील चहा, कॉफी, दूध, नाश्त्याचा कौतुकास्पद उपक्रम व दुसरीकडे प्रसादातून हिशोब जुळविण्याची कसरत, हे गणित काही भाविकांना कळेनासे झाले आहे. बाबांच्या दर्शनानंतर प्रसादाची गोडी आता भाविकांच्या खिशाला परवडणार का? हाच खरा प्रश्न आहे.
तुपाचे दर वाढले आहेत, त्यामुळे खर्च वाढणार आहे. लाडू पाकीट विक्रीतून जो काही नफा मिळेल, त्यातून दर्शनानंतर दिल्या जाणाऱ्या मोफत बुंदी प्रसादाची काहीशी तूट कमी होण्यास मदत होईल- गोरक्ष गाडीलकर, सीईओ, साईबाबा संस्थान