मंगल कार्यालयांभोवती आता पोलिसांचा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:24 IST2021-03-09T04:24:11+5:302021-03-09T04:24:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मंगल कार्यालये आणि हॉटेल, रेस्टारंटमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. या ...

मंगल कार्यालयांभोवती आता पोलिसांचा पहारा
अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना मंगल कार्यालये आणि हॉटेल, रेस्टारंटमध्ये मोठी गर्दी दिसून येत आहे. या गर्दीला रोखण्यासाठी ९ ते १४ मार्च या काळात मंगल कार्यालयाभोवती पोलिसांचा पहारा राहणार आहे. ५०पेक्षा जास्त लोकांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस या कार्यालयांवर नजर ठेवणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारी रात्री दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी नगर जिल्ह्याचा ऑनलाइन आढावा घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी भोसले यांनी आरोग्य यंत्रणेची तातडीने बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या बाधित रुग्णांचा आकडा रोज ३०० ते ३५०च्या दरम्यान आहे. त्यामुळे जिल्ह्यात चिंतेचे वातावरण आहे. अशाही स्थितीत लग्न समारंभात मोठी गर्दी दिसते आहे. लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी नाही, मात्र मंगल कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: कारवाई केली तरी गर्दी कमी होताना दिसत नाही. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला असता ८ मार्च ते १४ मार्च या कालावधीत नगर शहर व जिल्ह्यातील ४४ मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा ४४ ठिकाणी आता पोलिसांचा खडा राहणार आहे. गर्दी रोखण्यासाठी पोलीस कारवाई करतील.
रेस्टारंट, हॉटेलमध्ये क्षमतेपेक्षा ५० टक्के लोकांनाच परवानगी आहे. मात्र इथेही नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे आता हॉटेल, रेस्टारंटवरही धाडी टाकण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थेट कारवाईचा इशाराच जिल्हाधिकारी भोसले यांनी दिला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
----------
शाळांचा निर्णय तीन दिवसांनी
नाशिक आणि औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेथे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. हे दोन्ही जिल्हे शेजारी आहेत. या पार्श्वभूमीवर नगरची स्थितीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक होईल. या समितीच्या शिफारशीनंतर तीन दिवसांनी शाळा-महाविद्यालये बंद ठेवायची की नाही, याचा निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.