अहमदनगरमध्ये पोलिसदादांनी थोपटले दंड, बंदोबस्तातही प्रचाराचा धुराळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 17:09 IST2023-03-30T17:08:22+5:302023-03-30T17:09:01+5:30
अहमदनगर जिल्हा पोलिस सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे.

अहमदनगरमध्ये पोलिसदादांनी थोपटले दंड, बंदोबस्तातही प्रचाराचा धुराळा
अण्णा नवथर
अहमदनगर: नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीसतास खडा पहारा देणारे खाकी वर्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांनी सोसायटीच्या निवडणूकीत उडी घेतली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी सोसायटीवर झेंडा फडकविण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पॅनलचे उमेदवार असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. सोसायटीसाठी दोन्ही गटाच्या उमेदवारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून, सोसायटी कुणाच्या ताब्यात जाते, याचीच सध्या पोलिस मतदारांना उत्सुकता आहे.
अहमदनगर जिल्हा पोलिस सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. येत्या ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदानासाठी अवघे दहा दिवस राहिले आहेत. त्यामुळे निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. सत्ताधारी जयश्रीराम पॅनलमध्ये २१ उमेदवार असून, त्यांचे नारळ हे चिन्ह आहे. या मंडळाच्या विरोधात परिवर्तन पॅनल निवडणूकीच्या मैदानात उतरले असून, त्यांचे चिन्ह छत्री आहे. दोन्ही पॅनलकडून मतदान करण्याचे आवाहन पोलिसांना करण्यात येत आहे.