पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आठ हजार लोकसंख्येच्या पिंपळगाव माळवी गावामध्ये मागील दहा दिवसांपासून नळ पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असून ग्रामपंचायत प्रशासन या गोष्टींबाबत उदासीन असलेले दिसून येत आहेत.
पिंपळगाव माळवी येथे पिण्याच्या पाण्यासाठी बुऱ्हाणनगर पाणी योजनेतून मुळा धरणाचे पाणी मिळते. परंतु, कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे ही योजना काही दिवस बंद होती व आता पुन्हा चालू झाली. परंतु, अद्यापही पिंपळगाव माळवी ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेचे पाणी टाकीपर्यंत पोहोचले नाही. तलाव परिसरात ग्रामपंचायतीच्या स्वमालकीच्या दोन कूपनलिका असून तलाव काठोकाठ भरलेला असून कूपनलिकेलादेखील भरपूर पाणी आहे. परंतु, ग्रामपंचायत प्रशासनाने या कूपनलिकाही पर्यायी व्यवस्था म्हणून अद्याप सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे तलाव उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था पिंपळगावच्या ग्रामस्थांची झाली आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामस्थ दहा दिवसांपासून पाणीटंचाईला तोंड देत असून यामुळे महिलावर्गाची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
---
बुऱ्हाणनगर पाणी योजनेच्या पाइपलाइनच्या वाॅलमध्ये बिघाड झाल्यामुळे पाणी पुरवठ्यास उशीर झाला. पिंपळगाव तलावाजवळील कूपनलिका सुरू केली असून पाणीपुरवठा सुरळीत होईल.
-दत्तात्रय शेळके,
ग्रामविकास अधिकारी, पिंपळगाव माळवी