करंजी : गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी व सातवड गावापासून अवघ्या ३ कि. मी. अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. रखडलेला ४६ लाख रूपयांचा निधी नुकताच वर्ग झाला आहे.
ढोलेश्वर मंदिर व परिसराची अवस्था अतिशय दयनीय होती. या देवस्थानचा विकास व्हावा अशी ग्रामस्थांबरोबरच भाविकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. देवस्थानच्या विकासासाठी दोन वर्षांपूर्वी २०१८ साली पर्यटन विकास विभागाकडून विशेष प्रयत्न करून ५६ लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यात फक्त १० लाखाच्या कामास मंजुरी होती. उर्वरित ४६ लाख रूपये निधी अडकल्याने देवस्थानचा विकास रखडला होता.
मंदिर विकास कामे लेखाशिर्ष ३४५२ अंतर्गत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या देवस्थानचा रखडलेला निधी तत्काळ मंजूर केला. निधी मिळविण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाठपुरावा केल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय पाठक यांनी दिली. सरपंच राजेंद्र पाठक, कानिफ पाठक, सुभाष वाघ, कोंडीभाऊ वाघ, विनायक पाठक, उद्धव पाठक, बाळासाहेब वाघ आदींनी तनपुरे यांचे आभार मानले.