कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बातम्यांची सक्ती करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:12+5:302021-07-24T04:14:12+5:30

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न अनेक कृषी महाविद्यालये आहेत. कृषी पदवीधर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना ग्रामीण कृषी ...

News should not be forced on students studying agriculture | कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बातम्यांची सक्ती करू नये

कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बातम्यांची सक्ती करू नये

महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न अनेक कृषी महाविद्यालये आहेत. कृषी पदवीधर अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थिनींना ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करावे लागते. काही आठवड्यांचा हा कार्यक्रम आहे. यात वेगवेगळी प्रात्यक्षिके करणे, शेती प्रश्नावली, वेळापत्रक भरणे, विस्तार कार्यक्रम घेणे. माती-पाणी परीक्षण, बीजप्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, चारा-पीक नियोजन, विविध विषयांवरील प्रात्यक्षिके, ऑनलाइन चर्चासत्रे आणि ग्रामीण शेतकऱ्यांचा नवनवीन तंत्रज्ञानातील सहभाग असे विविध उपक्रम विद्यार्थी, विद्यार्थिनी त्यांच्या मूळगावी राबवत आहेत. यात त्यांचा मोठा वेळ जातो. असे असताना त्यांना कृषी महाविद्यालयाकडून उपक्रमांच्या बातम्या वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे. प्रसिद्धीसाठी महाविद्यालयाकडून बातम्यांची सक्ती करण्यात येते आहे.

ग्रामीण भागात उपक्रम राबविणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी लांबून-लांबून वर्तमानपत्रांच्या कार्यालयात येतात. अनेकदा त्यांची धावपळ होते. महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या बंद असल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणात हेळंसाड होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. तरीही विद्यार्थी, विद्यार्थिनींना राबविलेल्या उपक्रमांचे वृत्त वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे सक्तीचे करण्यात आले आहे. एकीकडे उपक्रम राबवत असताना दुसरीकडे मात्र, बातम्या छापून आणण्यासाठी अनेकांची वारंवार धावपळ सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे कृषीचे शिक्षण घेणाऱ्यांना कुठल्याही बातमीसाठी सक्ती करू नये, असे छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे राज्य संघटक घुले यांनी सांगितले.

Web Title: News should not be forced on students studying agriculture