नेवासे राज्य मार्गावरून जाताय? सावधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:24+5:302021-07-21T04:15:24+5:30
स्टार ९३१ श्रीरामपूर : श्रीरामपूर - नेवासे या राज्य मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यातच गेले अनेक दिवस ...

नेवासे राज्य मार्गावरून जाताय? सावधान
स्टार ९३१
श्रीरामपूर : श्रीरामपूर - नेवासे या राज्य मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. त्यातच गेले अनेक दिवस सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालक पुरते हैराण होत आहेत. दुचाकीस्वारांना पाठीचे आजार जडले आहेत, तर वाहनचालकांना महिन्याला वाहन दुरूस्तीवर पैसे खर्च करावे लागत आहेत. हा रस्ता राज्यमार्ग क्रमांक ५० म्हणून ओळखला जातो. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला जोडणारा हा एक प्रमुख मार्ग आहे. मात्र, या मार्गावर मोठेमोठे खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. श्रीरामपूर शहरालगत असलेल्या उड्डाणपुलावरही खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.
---------
पाच वर्षे दुरूस्ती नाही
या मार्गावरूनच उत्तर नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांची ऊस वाहतूक केली जाते. जायकवाडी धरणाच्या बॅकवाॅटरवरील उसाच्या पट्ट्यातून उसाने भरलेली वाहने या मार्गाने सुरू असतात. त्यामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यातच मागील पाच वर्षे या राज्य मार्गाची कुठल्याही प्रकारे दुरूस्ती करण्यात आलेली नाही.
------------
निविदा मंजूर
सुमारे १२५ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाचे आदेश संबंधित ठेकेदाराला प्राप्त होतील. एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांनी दिली.
-----------
नेवासे राज्य मार्गावरील काही खड्डे बुजविण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे. कारण तेथे मोठा अपघात घडण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आम्ही दुरूस्त करणे दुर्दैवी आहे. रस्त्याच्या कामाला लवकर सुरुवात झाली तर हरकत नाही. मात्र, उशीर होणार असेल तर बांधकाम विभागाने खड्डे बुजवायला हवेत.
- कान्हा खंडागळे, उपसरपंच, टाकळीभान.
-----------
फोटो ओळी : नेवासेमार्ग
नेवासे राज्य मार्गावर टाकळीभाननजीक पडलेले मोठमोठे खड्डे.
----------