अजित पवार गटाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी समोर आली. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील विठे घाटात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात लहामटे थोडक्यात बचावले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली. जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर लहामटे आपल्या निवासस्थानी परतले.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार लहामटे हे अकोले येथून राजूरकडे जात असताना विठे घाटात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून आमदार लहामटे थोडक्यात बचावले. परंतु, त्यांच्या पायाला दुखापत झाली. अपघातानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर लहामटे हे त्यांच्या राजूर येथील निवासस्थानी परतले. या अपघातात लहामटे यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे समजत आहे.
डॉ. किरण लहामटे हे अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अकोले मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला.
दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लहामटे यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शविला. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी आपली भूमिका बदलली आणि शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा बदल झाला आणि ते पुन्हा एकदा अजित पवारांच्या गटात सामील झाले.