नंदीवाल्यांनी घातला महिलांना ५० हजाराचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:16+5:302021-07-18T04:16:16+5:30
नगर शहरातील भिस्तबाग चौकाजवळील कसबेमळा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सविता भारत ...

नंदीवाल्यांनी घातला महिलांना ५० हजाराचा गंडा
नगर शहरातील भिस्तबाग चौकाजवळील कसबेमळा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सविता भारत मवाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी मवाळ यांच्या दारात नंदीबैल घेऊन तीन जण आले. यावेळी तुमचे भविष्य सांगून वर्तमानातील अडचणी आम्ही दूर करू, असे त्यांनी सविता मवाळ व त्यांच्या जाऊ यांना सांगत विश्वास संपादन केला. यासाठी मात्र मोठी पूजा घालावी लागणार असून, त्यासाठी १ लाख ३७ हजार रुपये खर्च येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूजेसाठी मवाळ यांनी त्या तिघांकडे ५० हजार रुपये दिले. पूजेसाठी परत येतो, असे त्या तिघांनी सांगितले. मात्र ते तिघे परत आलेच नाही. त्यानंतर मवाळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करीत आहेत.