मुसळवाडी तलावाची लवकरच दुरूस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST2021-04-05T04:18:24+5:302021-04-05T04:18:24+5:30
श्रीरामपूर : मुसळवाडी (ता. राहुरी) येथील दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेत झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांची बुधवारी बैठक ...

मुसळवाडी तलावाची लवकरच दुरूस्ती
श्रीरामपूर : मुसळवाडी (ता. राहुरी) येथील दहा गावांच्या पाणीपुरवठा योजनेत झालेला बिघाड दुरूस्त करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांची बुधवारी बैठक बोलविण्यात आल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
राहुरी तालुक्यातील या योजनेवर महालगाव, खुडसरगाव, शेणवडगाव, वांजुळपोई, मालुंजे, माहेगाव, पाथरे, कोपरे, तिळापूर व मुसळवाडी या गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, योजना नादुरूस्त झाल्याने जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच हा प्रश्न उपस्थित केला होता, अशी माहिती कानडे यांनी दिली.
कानडे म्हणाले, योजनेच्या दुरूस्तीसाठी जिल्हा आराखड्यामध्ये ८ कोटी रुपयांची तरतूद होती. मात्र, जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहिती नव्हती. अधिकाऱ्यांनी योजनेच्या दुरूस्तीसाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचे नाटक केले. मुख्य फिल्टर प्लान्ट दुरूस्तीऐवजी थातुरमातूर कामे सुचविण्यात आली. सर्व गावांना पाणी का पोहोचत नाही? यावर मात्र त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.
मुसळवाडी तलावात उगवलेल्या वनस्पती व शेवाळामुळे पाणी दुर्गंधीयुक्त होते. त्यासाठी नव्या फिल्टर प्लान्टची आवश्यकता आहे. वनस्पतींचा नायनाट करण्यासाठी काही उपाययोजनांची गरज आहे. योजनेचा जुना आराखडा रद्द झाला आहे. जलजीवन मिशनमधून सर्व घरांना नळजोडणी द्यायची आहे. त्याकरिता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन त्यांनी लेखी पत्र दिले. संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योजनेच्या दुरूस्तीची मागणी केली. त्याला मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने गावकरी म्हणतील त्या पद्धतीने दुरूस्ती करून प्रस्ताव पाठवावा, असे आदेश दिले. त्यानुसार मुसळवाडी येथे गटविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावल्याचे आमदार कानडे यांनी सांगितले.
लवकरच योजनेच्या दुरूस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या गावांची तहान भागवली जाईल, असा विश्वास कानडे यांनी व्यक्त केला.
------------