Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 12:32 IST2018-12-09T06:04:42+5:302018-12-09T12:32:21+5:30
महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला.

Dhule Municipal Election 2018 : पैशांचा खेळ, आरोपांच्या फैरी; नगर, धुळ्यात आज मतदान
धुळे/अहमदनगर : महापालिका निवडणुकीसाठी रविवारी धुळे व अहमदनगरमध्ये मतदान होत असून, धुळ्यात पैशांचा खेळ सुरू आहे. पैसेवाटप करीत असल्याच्या संशयावरून शनिवारी पहाटे दोन जणांवर चाकूहल्ला झाला. हल्ल्याप्रकरणी लोकसंग्रामच्या चार जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला. याशिवाय अन्य घटनेत एकास ४९ हजार रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे मतदारयादी सापडली. अहमदनगरमध्ये शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीत चुरस आहे.
धुळ्यात ७४ जागांसाठी ३५५ तर नगरला ६८ जागांसाठी ३३९ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही ठिकाणी सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. धुळ्यात आमदार अनिल गोटेंच्या (लोकसंग्राम पक्ष) रूपाने भाजपा विरोधात भाजपा अशी लढत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढत आहे. भाजपाविरोधात सर्वच पक्ष एकवटले आहेत. काही प्रभागात या पक्षांनी एकमेकांना पडद्यामागून पाठिंबा दिला आहे. भाजपा महिला उमेदवाराच्या विनयभंगाचीही तक्रार दाखल झाली आहे. लोकसंग्रामच्या गुंडांनी धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली़ त्यामुळे गुंड कोण, हे धुळेकरांनीच ठरवावे़ आमदार उगाच आदळआपट करीत आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी केली.
अनिल गोटे यांचा आरोप
भाजपाला सत्तेचा माज व पैशांची मस्ती चढली आहे़. चार खासदार, २२ आमदार आणि पाच जिल्ह्यांतील भाजपाचे मंत्री धुळ्यात आले आहेत. पोलिसांसह यंत्रणा दडपणाखाली आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी केला.