राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ‘या’ प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 23:48 IST2021-11-02T23:46:45+5:302021-11-02T23:48:25+5:30
भारतीय जनता पक्षासह (BJP) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; ‘या’ प्रश्नासंदर्भात मनसे आक्रमक
अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बसमध्येच आत्महत्या केल्याच्या घटनांनी राज्यभरात खळबळ उडाली आहे. यातच भारतीय जनता पक्षासह (BJP) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. याच संदर्भात राज ठाकरे (Raj Thackeray) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
शेवगाव आगारातील चालक दिलीप काकडे यांनी आत्महत्या केल्यानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे व प्रवक्ते प्रकाश महाजन शेवगाव येथे आले होते. त्यांनी काकडे यांच्या मूळ गावी आव्हाणे येथे जावून काकडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मनसेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेशही काकडे कुटुंबीयांना देण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना परिवहन मंत्रीच जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार
काकडे यांच्या वारसाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करत परिवहन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. काकडे यांनी आत्महत्या केली असून त्यांनी परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी बलिदान दिले आहे. एसटीचे कर्मचारी जोखमीचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. प्रवाशांसाठीही व कर्मचाऱ्यांसाठीही एसटी वाचली पाहिजे. अशीच भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही आहे. महाविकास आघाडी व भाजप सत्तेसाठी भांडत आहेत. यामुळे इतर समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. अनावश्यक गोष्टींवर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, परिवहन कर्मचाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप धोत्रे यांनी यावेळी केला. तसेच कोरोना काळातही मनसेने रस्त्यावर उतरून नागरिकांना प्रत्यक्ष मदत केल्याचे धोत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.