भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 17:46 IST2025-07-08T17:34:26+5:302025-07-08T17:46:09+5:30
अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
Ahilyanagar Accident: अहिल्यानगरमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. आमदार सुरेश धस यांच्या मुलाने सोमवारी रात्री कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस रात्रीच्या सुमारास अहिल्यानगर पुणे महामार्गावरुन प्रवास करत होता. दुचाकीस्वार जातेगाव फाट्यावरुन येत असताना सागर धस यांच्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली ज्यात नितीन शेळके याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी सागर धसविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याने सोमवारी कार चालवताना एका दुचाकीस्वाराला धडक दिली. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव आहे. सुपा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागर धसच्या गाडीने त्याला जोरदार धडक दिली. सागर धस हे रात्री आष्टीवरून पुण्याच्या दिशेला निघाले होते. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सुपा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात झाला. दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून येत असताना सागरच्या कारनं त्याला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये सागर धसच्या गाडीचेही मोठं नुकसान झालं असून त्यावरुन धडक किती जोरदार बसली याचा अंदाज येत आहे.
सागर धस याच्या एमजी हेक्टर या गाडीखाली येऊन अहिल्यानगरमधील नितीन शेळके या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराला दवाखान्यात नेईपर्यंतच त्याचा मृत्यू झाला. मात्र सोमवारी रात्री गुन्हा घडल्यानंतरही मंगळवारी दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरुच होती. सागर धस या सुरेश धस यांचा धाकटा मुलगा आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून सागर हा स्वतः गाडी चालवत होता की अजून कुणी चालवत होतं याची माहिती घेतली जात आहे.