लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड; नाशिकच्या दोन तरुणींसह महिलेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:30 IST2026-03-24T16:30:03+5:302026-03-24T16:30:03+5:30
Ahilyanagar Crime: लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची हतबलता ओळखून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न लावून द्यायचे आणि दोनच दिवसांत दागिने-रुपये ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुटणारी टोळी गजाआड; नाशिकच्या दोन तरुणींसह महिलेला बेड्या
Ahilyanagar Crime: लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याची हतबलता ओळखून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, लग्न लावून द्यायचे आणि दोनच दिवसांत दागिने-रुपये घेऊन पोबारा करायचा... अशा फिल्मी स्टाईलने लूट करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा कोपरगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नाशिक येथील आडगाव नाका परिसरातून एका महिलेसह दोन तरुणींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोपरगाव तालुक्यातील रंवदे गावातील एका तरुणाचे लग्न जमत नसल्याचा फायदा या टोळीने घेतला. नाशिकमधील सहा जणांनी या तरुण आणि त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला. त्यांनी एक मुलगी दाखवून लग्नासाठी पैशांची मागणी केली. व्यवहार ठरल्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्न लावून देण्यात आले. मात्र, नवरी बनून आलेली तरुणी मुलाच्या घरी केवळ दोन दिवस राहिली आणि संधी मिळताच घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड घेऊन पसार झाली.
२१ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या
पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले. गुप्त माहिती आणि सायबर सेलच्या मदतीने पोलिसांना आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाली. कशिष सुकदेव भालेराव, नम्रता सुकदेव भालेराव आणि भूमी किरण निकम यांना अटक करण्यात आली. तर अशोक तानाजी काळे, वनिता अशोक काळे आणि गोकुळ चिंदा पानकर हे फरार आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या तिघींकडून रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
ही टोळी केवळ एकाच गुन्ह्यापुरती मर्यादित नसावी, असा पोलिसांचा संशय आहे. मुली कमी आणि लग्नाळू मुले जास्त या सामाजिक समस्येचा फायदा घेऊन या टोळीने उत्तर महाराष्ट्रात आणखी किती तरुणांना लुटले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सोमवारी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पोलीस कोठडीत अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.