महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 23:39 IST2019-10-24T23:38:29+5:302019-10-24T23:39:25+5:30
Maharashtra Election 2019: भाजप, शिवसेनेचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली.

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात
अहमदनगर: भाजप, शिवसेनेचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. मात्र, आज काँग्रेस, राष्ट्रावादी कॉँग्रेस व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण बनू शकते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला.
थोरात म्हणाले की, या समीकरणासाठी आम्हाला वरिष्ठांकडून मान्यता घ्यावी लागेल. परंतु शिवसेनेने प्रथम मन बनविले पाहिजे. भाजपच्या प्रभावाखाली रहायचे नाही, त्यांना घाबरायचे नाही. हे आता त्यांनी ठरविले पाहिजे. यासाठी वरिष्ठ पातळीवर आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने मला संगमनेर विधानसभा मतदारसंघात वेळ देता आला नाही.
काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेने संपूर्ण मतदारसंघ सांभाळत येथील निवडणूक हाती घेत मला मोठ्या मताधिक्याने विजयी केले. काही वृत्तवाहिन्यांनी मतदानानंतर चुकीचे अंदाज दाखविले होते. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणांवर शंका होती. काँग्रेस नेत्यांचा पराभव दिवसातून ते शंभरवेळा दाखवत होते. त्यांनी निवडणुकीच्या निकालाचे चुकीच्या पध्दतीने सर्वेक्षण केले. यातून कार्यकर्त्यांना मानसिक त्रास झाला. हे निंदा करण्यासारखे आहे.