लॉकडाऊनमुळे मुलांमधील स्थुलता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST2021-09-08T04:26:32+5:302021-09-08T04:26:32+5:30
श्रीरामपूर : कोविडमुळे गेली दोन वर्षे शाळांचे कुलूप उघडू शकलेले नाही. त्यामुळे लहान मुलांचे मैदानी खेळ बंद झाल्यात जमा ...

लॉकडाऊनमुळे मुलांमधील स्थुलता वाढली
श्रीरामपूर : कोविडमुळे गेली दोन वर्षे शाळांचे कुलूप उघडू शकलेले नाही. त्यामुळे लहान मुलांचे मैदानी खेळ बंद झाल्यात जमा आहे. त्याचा आरोग्यावर थेट परिणाम होत असून, मुलांमधील स्थुलतेचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात आर्थिक संकट ओढवल्याने कुपोषित मुले आढळून येत आहेत.
ग्रामीण भागात गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना पुरेसा सकस, पौष्टिक आहार मिळत नाही. यामुळे दिवसेंदिवस कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. शहरांमध्ये उलट स्थिती आहे. लॉकडाऊनमुळे दोन वर्षांपासून मुले घरांमध्ये कोंडली गेली आहेत. सतत टीव्हीसमोर बसणे आणि मोबाइलवर गेम खेळणे यांमुळे अतिपोषण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांचे वजन वाढले असून, त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा बळावल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
शहरातील मुलांचा दिनक्रम केवळ टीव्ही पाहणे व खाणे एवढ्यापुरताच मर्यादित झाला आहे. अभ्यासक्रमही ऑनलाइन झाल्याने घराबाहेर पडण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यामुळे स्थुलता वाढत जाऊन इतर आजारांनाही आपोआपच निमंत्रण मिळते. त्यामुळे पालकवर्ग चिंतेत सापडला आहे.
----------
कारणे काय
फास्ट फूडकडे कल.
मैदानी खेळ झाले बंद.
प्रथिनेयुक्त आहाराची कमतरता.
---------
मुले टीव्ही पाहून जेवण करण्याचा हट्ट धरतात. त्याशिवाय ते जेवण घेत नाहीत. त्यातून आपण किती खातो, याचे भान त्यांना राहत नाही.
-भरत बाठीया, पालक, बेलापूर.
----------
पूर्वी मुलांमध्ये सतत हुंदाडणे सुरू असायचे. अगदी आई-वडील कान धरून मुलांना घरी घेऊन जात. आता मात्र मुले घराबाहेर जाऊन खेळत नाहीत. त्यामुळे चयापचयामध्ये जे ज्वलन व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याऐवजी साठवण्याची निरंतर प्रक्रिया सुरू राहते व त्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत.
-डॉ.महेश क्षीरसागर, आयुर्वेद तज्ज्ञ.
-------
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
कमी वजनाची बालके २४ हजार
तीव्र कमी वजनाची ३ हजार ८७४
(२०२० ची आकडेवारी)
---------