दाढ खुर्दसह परिसरात मागील काही दिवसांपासून बिबटे सतत शेतकऱ्यांच्या पशुधनावर रात्री-अपरात्री हल्ले करत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे संतू वाघमारे यांच्यासह लगतच्या शेतकऱ्यांनी वनविभागाला पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन वनविभागाचे पारेकर व हरिश्चंद्र जोजार यांनी संतू आनंदा वाघमारे यांच्या गट नंबर १४४ मध्ये पिंजरा लावला होता. रविवारी रात्री शिकारीच्या शोधात निघालेला बिबट्या अखेर या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हा नर जातीचा बिबट्या असून त्याला निंबाळे रोपवाटिकेत नेण्यात आले आहे.
दरम्यान, दाढ शिवारात अनेक बिबटे असून शेतकऱ्यांच्या कोंबड्या व शेळ्या व लहान कालवडीवर हल्ले करत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वनविभागाने या परिसरात आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी शेतकरी संतू वाघमारे यांनी केली आहे.